कॅम्पाकोलासाठी कायदा मोडणार नाही – मुख्यमंत्री

मुंबई – कॅम्पाकोला इमारतीच्या बाबतीत न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर मुख्यमंत्री ठाम असल्याचे संकेत आहेत. कारण पुढे कुणीही अशी हिंमत करू नये, अशा पद्धतीने कायदे बनवण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांनी कॅम्पाकोलाविषयीची आपली ही ठाम भूमिका, शहरीकरण आणि झोपडपट्टी पुनर्वसन संदर्भातील प्रश्‍नावर उत्तर देताना स्पष्ट केली. कॅम्पाकोलामध्ये ज्या पद्धतीने कायद्याचे उल्लंघन झाले आहे, अशी हिंमत पुढे कोणी करणार नाही, अशा पद्धतीने कायदे राबवणे गरजेचे आहे, असे यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. लोकप्रिय निर्णय घेतले, की ते पुन्हा बदलता येत नाहीत, आणि निव्वळ वोट बँकसाठीच असे निर्णय घेतले जातात, अशी खंत ही मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवली.

एनएसयूआय मुंबईच्या संवाद या कार्यक्रर्मात मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांची उत्तरे दिली, त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. कॅम्पा कोला सोसायटीविषयी राजकीय पक्षांना अचानक कळवळा आला आहे, यात काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचाही समावेश आहे, यामुळे मुख्यमंत्री आपल्या भूमिकेवर आणखी किती काळ ठाम राहतील, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.