जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे- मुख्यमंत्री चव्हाण

मुंबई- आज धर्मांधशक्ती देशात असुरक्षिततेचे वातावरण तयार करून येत्या निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. या जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी सर्वांना एकत्र घेऊन उभी राहिलेली भारत, ही संकल्पना जनतेसमोर प्रकर्षाने मांडायला हवी, असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी केले. इतर मागासवर्गीयांची शिष्यवृत्ती कमी करणार्‍या आदेशात त्वरित सुधारणा केली जाईल, असेही त्यांनी यावेळी जाहीर केले.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या यशवंतराव चव्हाण केंद्रात झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी जातीयवादी शक्तींनी वेगळे डावपेच आखले आहेत. आर. एस. एस. सारखी संघटना आता उघडपणे मैदानात उतरली आहे. अडवाणींसारख्या ज्येष्ठ कार्यकर्त्याचा मुलाहिजा न ठेवता ते पुढे आले आहेत. पाश्चिमात्य देशांमधील जनसंपर्काचे तंत्र वापरले जात आहे. प्रसिद्धीमाध्यमांना विकत घेतले जात आहे. सभांमध्ये कशी माणसे आणायची, कसा प्रचार करायचा याची आखणी करून भुरळ टाकली जात आहे. या विषारी जाहिरातबाजीला कसे उत्तर द्यायचे हे ठरविले पाहिजे. या प्रचाराला उत्तर दिले नाही तर निवडणुकीत आपले नुकसान होऊ शकते. बाबरी मशीद पाडल्यानंतर मुंबईत दंगली झाल्या.

सांगली-मीरजमध्ये दंगली झाल्यानंतर तेथे त्यांनी जागा जिंकल्या. मुझफ्फरनगरमध्येही तसेच झाले. या निवडणुकीच्या काळात काही तरी कुरापत काढून बहुसंख्य समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न करून एक वेगळा देश उभारण्याचा प्रयत्न होईल, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली. अनुसूचित जाती-जमातीसाठी केंद्राकडून पूर्ण परतावा मिळतो. इतर मागासवर्गीयांच्या शिष्यवृत्तीबाबत केंद्राकडून पूर्ण परतावा मिळत नाही. तो वेळेवरही मिळत नाही. हे पैसे कसे वेळेवर मिळतील हे पाहतानाच ती कमी करण्याबाबत काढण्यात आलेल्या आदेशात त्वरित दुरूस्ती करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

शिवसेनेची ताकद आता शिल्लक राहिली नाही. चौथ्या क्रमांकावर असलेल्या या पक्षाचा प्रसिद्धीमाध्यमावर उगाचच उदोउदो केला जात आहे. सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी आर. एस. एस. देशात तोडफोडीचे राजकारण करत आहे. ते यशस्वी झाल्यास या देशाचे तुकडे पडल्याशिवाय राहणार नाहीत, असे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे म्हणाले. यावेळच्या निवडणुकीत काँग्रेसने युवकांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी केले. आघाडी होईल तेव्हा होईल, प्रत्येक जिल्ह्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्याला संरक्षण मिळाले पाहिजे, असे ते म्हणाले.

काँग्रेसमध्ये दुसर्‍या फळीचे नेतृत्त्व निर्माण न झाल्यामुळे प. बंगाल, ओरिसा, उत्तर प्रदेश तसेच बिहारमध्ये काँग्रेस पराभूत झाली असे सांगतानाच अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजीव सातव यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढविला. ही संघटना आता निकामी झाली आहे. साडेचार वर्षे मुख्यमंत्री राहिलेली व्यक्ती नेत्यांसमोर उठून निघून जाते हे कसले द्योतक आहे, असा सवाल त्यांनी केला. मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा असे म्हणणारे छोटे ठाकरे, हे अलीबाबा मुंबईत बसले असून त्यांचे 40 नगरसेवक नाशिकमध्ये लूट करत आहेत, असेही ते म्हणाले. महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजीत कदम, हर्षवर्धन पाटील, पतंगराव कदम आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Leave a Comment