धनंजय मुंडेंनी भरले व्याजाचे एक कोटी रुपये

बीड – मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेती गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आमदार धनंजय मुंडे यांना तात्काळ एक कोटी रुपये भरण्याचे आदेश दिल्यानंतर आज मंगळवारी आमदार मुंडे यांनी रक्कम भरल्याचे सांगण्यात आले तर या प्रकरणात अडकलेले आणि डिसीसीचे पैसे उचललेले अन्य फरारी नेतेही आता पैसे जमवण्यासाठी धावपळ करू लागले आहेत.

राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी, बीड जिल्हा सहकारी बँकेची थकवलेल्या व्याजाची एक कोटीची रक्कम जमा केली आहे. मुंडेंनी परळीच्या शाखेत व्याजाची रक्कम भरली आहे. धनंजय मुंडेंकडे जिल्हा बँकेची 12 कोटीची थकबाकी आहे. धनंजय मुंडे यांनी बीड जिल्हा सहकारी बँकेतल्या घोटाळ्याप्रकरणी कोर्टात धाव घेतली होती. जिल्हा बँकेतल्या घोटाळ्यात लावलेले गुन्हे मागे घ्यावे, अशी मागणी त्यांनी हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे केली होती.

मात्र, मुंडेंना दिलासा देण्याऐवजी कोर्टाने थकवलेल्या व्याजाची रक्कम भरण्याचे आदेश दिले. व्याजाचे पैसे भरले असले तरी थकबाकी कधी भरणार, असा सवालही आता विचारला जात आहे. विशेष म्हणजे दसर्‍याच्या दिवशी भगवानगडावरून भाजपा नेते गोपीनाथ मुंडेंनीही धनंजयसह विरोधकांना पैसे कधी भरणार असा सवाल विचारला होता. शेवटी त्याची सुरुवात धनंजय मुंडेंना करावी लागली आहे.

Leave a Comment