राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात अडचणीत

मुंबई – शरद पवार यांनी १९९९ साली सोनिया गांधी यांच्या विदेशीपणावर हरकत घेऊन काँग्रेसमधून बाहेर पडल्यावर स्थापन केलेला व महाराष्ट्रभर राष्ट्रवादी काँग्रेस नावाने परिचित झालेला पक्ष आता चांगलाच अडचणीत सापडला असून या पक्षापुढे निवडणुका नजीक आल्या असताना चांगलेच संकट उभे राहिले आहे.

या संबंधीची हकीकत अशी की गेल्या काही आठवड्यांपूर्वी विनोद गंगवाल या वकीलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या नावाने नवा राजकीय पक्ष स्थापन केला असून ते या पक्षाचे महासचिव आहेत. गंगवाल यांनी हा पक्ष राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदविला असून राज्य निवडणूक आयोगाने त्याला मान्यताही दिली आहे. गंगवाल यांच्या म्हणण्याप्रमाणे १९९९ ला शरद पवारांनी त्यांच्या नव्या पक्षाची नोंदणी नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी या नावाने केली आहे.

शरद पवारांना हा पक्ष स्थापन करताना १४ वर्षांनंतर अशा कांही अडचणीचा सामना करावा लागेल हे कधी लक्षातही आले नसेल. गंगवाल यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या पक्षाची नोंदणी नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी नावाने झाल्याने ते राष्ट्रवादी काँग्रेस हे नांव वापरू शकत नाहीत. आजपर्यंत महाराष्ट्रात मात्र या पक्षाचे हेच नांव प्रचलित आहे. इतकेच नव्हे तर या पक्षातर्फे निवडून आलेले उमेदवारही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नावानेच निवडणूक लढवून शपथ घेतात. त्यामुळे आता १९५१ च्या जनप्रतिनिधी कायदा कलम ८ ए नुसार राष्ट्रवादीच्या ज्या उमेदवारांनी पक्षाच्या दोन नावांचा वापर करून निवडणूक लढविली त्या सर्वाच्या निवडीला गंगवाल कायदेशीर आव्हान देणार आहेत.