सिडनी – सर्वाधिक दाट वस्तीच्या, सिडनेच्या पश्चिमेला असलेल्या न्यू साऊथ वेल्स स्टेट मध्ये भडकलेल्या वाईल्ड फायरचे धैमान अजूनही सुरूच आहे. गुरूवारी भडकलेली ही आग अग्नीशमन दलाच्या सततच्या प्रयत्नांनंतरही अजून आटोक्यात आलेली नाही व या आगीत किमान १९३ घरे जळून खाक झाली आहेत तर अन्य १०९ घरांचे मोठे नुकसान झाले आहे.
आगीचे स्वरूप लक्षात घेता नुकसानीचा आकडा मोठा असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अग्नीशमन दलाने याहुनही अधिक वाईट परिस्थिती उदभवेल असा अंदाज बांधून त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे. पोलिस अंतर्गत भागात जाऊन नुकसानीचा अंदाज घेत आहेत. मृतांचा नक्की आकडा अद्यापी समजू शकलेला नाही. मात्र घरे, वाहने यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
या वर्षात ऑस्ट्रेलियात अशा प्रकारचे १०० हून अधिक वणवे लागले असून त्यामुळे मु्ख्य शहरांनाही धोका पोहोचला आहे. अर्थात दर वर्षी उन्हाळ्याच्या सुरवातीला म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये येथे असे वणवे पेटणे ही नित्याची बाब आहे. सध्या लागलेल्या वणव्यामुळे मुख्य रस्ते बंद केले गेले आहेत व १५०० अग्नीशमन बंब आग विझविण्याचा प्रयत्न करत आहेत.