सुरत : सुरत पोलिसांचे विशेष पथक आसाराम बापूंचा मुलगा नारायण साई याचा शोध घेत आहे. आसाराम आणि त्याच्या मुलावर बलात्काराचा आरोप करणा-या सुरतच्या दोन बहिणींनी मॅजिस्ट्रेटपुढे आपली जबानी दिली. त्यानंतर नारायणसाईविरूद्ध एफआयआर नोंदविण्यात आला आहे. सोमवारी दिवसभर सकाळी साडेदहा वाजल्यापासून रात्री साडे आठपर्यंत या दोन बहिणींची जबानी नोंदविण्याचे काम सुरू होते.
नारायण साईचा शोध सोमवारी दिवसभरात प्रयत्न करूनही लागला नाही. आता त्याच्या तपासासाठी इलेक्ट्रॉनिक्स सर्वेलन्सची मदत घेतली जात आहे. नारायण साईचा मोबाईल फोनही ट्रॅकिंगवर टाकण्यात आला आहे. यानंतरही नारायण साईचा ठावठिकाणा लागला नाही तर त्याच्याविरूद्ध आंतरराष्ट्रीय नोटीस जारी करून त्याचा पासपोर्ट रद्द करण्याची कारवाई केली जाणार आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नारायण साई देशाबाहेर नेपाळला जाण्याची शक्यता आहे.
काही जणांच्या मते नारायण साई देशातच कुठेतरी भूमिगत झाले असावेत. त्यांच्या सर्व निकटवर्तीयांनी आपले फोन स्वीच ऑफ केले आहेत. लवकरच या दोन बहिणींच्या जबानीच्या आधारे नारायण साईच्या सर्व आश्रमावर, पोलिसांपुढे स्वतःहून हजर होऊन जबाब देण्याची नोटीसही जारी केली जाणार आहे.