सुब्रतो रॉय यांनी केली ब्रिटनमध्ये पंचतारांकित हॉटेल खरेदी

लन्दन – सहारा समुहाचे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय यांनी ब्रिटनमध्ये एक पंचतारांकित हॉटेल विकत घेतलंय. सुब्रतो रॉय यांना भव्यदिव्य वारसा लाभलेल्या इमारती विकत घेण्याची आवड आहे, यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालंय. ब्रिटनमधील विन्डसरमध्ये असलेलं हे तारांकित हॉटेल त्यांनी 256 कोटी रूपयांना विकत घेतले आहे.

यापूर्वी त्यांनी ग्रॉसव्हेनर हाऊस हे पचंतारांकित हॉटेल 470 दशलक्ष पौंडाला विकत घेतलं होतं. ग्रॉसव्हेनॉर हाऊसचा व्यवहार अलीकडच्या काळातला रिअल इस्टेटमधील सर्वात मोठा व्यवहार ठरला होता. त्यांनी आता घेतलेल्या ओकले कोर्टमध्ये 118 बेडरूम आहेत.

ओकले कोर्ट या तारांकित हॉटेलचं बांधकाम गॉथिक शैलीतील आहे. तब्बल 40 एकरात पसरलेल्या या हॉटेलचं बांधकाम 1859 मध्ये झालेलं आहे. या हॉटेलचे मालक अर्नेस्ट ऑलीव्हर यांचं 1965 मध्ये निधन झाल्यानंतर जवळपास 14 वर्षे हे हॉटेल बंदच होतं. त्यानंतर अनेक हॉरर सिनेमाच्या शूटिंगसाठी सेट म्हणून या इमारतीचा वापर होऊ लागला. ब्रे स्टुडिओच्या अगदी समोर ही इमारत असल्यामुळे हॉरर सिनेमांच्या निर्मात्यांनी या इमारतीला पसंती दिली.

या इमारतीच्या गॉथिक शैलीमुळे जगप्रसिद्ध ड्रॉक्युला सिनेमात फ्रँक अँड फर्टरचा कॅसल म्हणून याच इमारतीचा वापर करण्यात आला होता. अगदी अलीकडे म्हणजे गेल्यावर्षी लंडन ऑलिम्पिकच्यावेळी अनेक पाहुण्या टीमच्या खेळाडूंची या हॉटेलमध्ये राहण्याची सोय करण्यात आली होती.

ओकले कोर्ट या हॉटेलला नऊ होलचं गोल्फ कोर्ट आहे. तसंच 11 आलीशान सूटसह 118 बेडरूम आहेत. त्याशिवाय कॉन्फरन्स हॉल आणि मीटिंग रूम यांचीही संख्या लक्षणीय आहे. या इमारतीचा वापर यापुढे हॉटेल म्हणून नाही तर आपल्या सहारा समूहाचं लंडनमधील मुख्यालय म्हणून करण्याचा मनोदय सुब्रतो सहारा यांनी व्यक्त केला आहे.