विवाह हा धार्मिक विधी नाही

मुंबई – विवाह हा धार्मिक विधी नाही असा महत्त्वपूर्ण निर्वाळा सेवा कर विषयक लवादाने एका खटल्यात दिला आहे. विवाह समारंभात काही धार्मिक विधी केले जातात. देवा ब्राह्मणांच्या साक्षीने विवाह होतो ही गोष्ट खरी आहे परंतु विवाह समारंभाला कायद्याच्या भाषेत धार्मिक विधी म्हणता येणार नाही. त्यामुळे विवाह समारंभ करणार्‍या मंगल कार्यालयांना धार्मिक समारंभ करणारी संस्था मानून सेवा करातून सूट देता येणार नाही असे या लवादाने बजावले आहे. कोल्हापुरातल्या एका मंगल कार्यालयाने हा वाद उपस्थित केला होता.

केंद्र सरकारने मंगल कार्यालयांना सेवा कर लागू केला परंतु कोल्हापूरच्या या मंगल कार्यालयाने विवाह समारंभ हा धार्मिक विधी असतो असे म्हणून धार्मिक समारंभाला देतात तशी सूट मंगल कार्यालयाच्या सेवा कराला द्यावी अशी मागणी करून सेवा कर विषयक ऍपिलेट कोर्टात अर्ज केला होता. ऍपिलेट कोर्टाने या मंगल कार्यालयांच्या संचालकांचे म्हणणे मान्य केले आणि त्यांचा सेवा कर रद्द केला. परंतु सेवा कर आयुक्तांनी या निर्णयाच्या विरुध्द संबंधित लवादाकडे दाद मागितली.

लवादाने ऍपिलेट कोर्टाचा निर्णय रद्द ठरविला आणि या मंगल कार्यालयाला दिलेली सूट रद्द ठरवली. लग्नाच्या समारंभाला धार्मिक विधी मानून त्या आधारावर मंगल कार्यालयाला सेवा करात सूट देण्याची कल्पना कायद्यात बसणारी नाही असे म्हणून लवादाने १९९९ पासूनचा या मंगल कार्यालयाचा सेवा कर वसूल करावा असा आदेश दिला.