जगातील सर्वात बारीक क्ष-किरण विकसित

जॉर्जिया – जगातील अतिशय बारीक क्ष-किरण विकसित करण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. या किरणाची तिरीप इतकी बारीक आहे की एका केसापेक्षा तब्बल दहा हजार पट पातळ आहे. या किरणाचा व्यास 5 नॅनोमीटर इतका आहे. या किरणाची निर्मिती गॉटिन्जेन विद्यापीठातील प्राध्यापक टिम सलडिट यांनी केली आहे. त्यामुळे अगदी लहानात लहान भागावरही हे किरण केंद्रित करता येणार आहेत.

नेहमीच्या भिंगाऐवजी आम्ही तथाकथित फ्रेस्नेल लेन्सचा वापर केला आहे, ज्यामध्ये अनेक स्तर आहेत, असे या प्रकल्पातील सहसंशोधक डॉ. मार्कस ऑस्टेरहॉफ यांनी सांगितले. अंतर्गत भागामध्ये मिलिमीटरचा हजारावा भाग इतकी पातळ टंगस्टन धातूची तार वापरण्यात आली. या तारेभोवती तितकेच पातळ असे सिलिकॉन आणि टंगस्टनचे एकावर एक असे आलटून पालटून थर चढवण्यात आले.

०त्यानंतर या तारेच्या लहान लहान चकत्या कापण्यात आल्या. या एका चकतीमध्ये सिलिकॉन व टंगस्टनचे 50 ते 60 स्तर असतात. एखाद्या वृक्षाच्या खोडामध्ये ज्या प्रकारे त्याची वाढ दर्शवणारे स्तर असतात, तशाच प्रकारचे हे स्तर आहेत. या चकतीमधील स्तरांची जाडीही अतिशय अचूक असण्याची आवश्यकता असते. याच चकत्यांचा वापर लेन्स म्हणून करण्यात आला. मात्र, या लेन्स काचेच्या लेन्सप्रमाणे प्रकाशाचे विकिरण करत नाहीत तर त्या प्रकाशाचे प्रकाशमान आणि काळोख्या पट्टयांमध्ये अपस्करण करतात.

ही लेन्स जितकी अचूक बनवली असेल तितका त्यातून बाहेर पडणारा क्ष-किरणाचा झोत बारीक प्रकाशझोत सोडण्यात आल्यानंतर हे तुकडे काचेच्या लेन्सप्रमाणे प्रकाशांचे पृथक्करण करत नाहीत पण ते प्रकाश इतरत्र पसरवत असल्याचे स्पष्ट झाले. यातूनच शास्त्रज्ञांनी आडवा व्यास 4.3 नॅनोमीटर (मिलिमीटरचा दशलक्षवा भाग) व उभा व्यास 4.7 नॅनोमीटर इतका पातळ किरण तयार करण्यात यश मिळवले.

या क्ष-किरणामुळे साहित्य विज्ञानामध्ये अनेक महत्त्वपूर्ण शोध लावण्यात मदत होणार आहे. सोलार सेलमध्ये वापरण्यात येणा-या नॅनो वायरची तपासणी करण्यासाठी या किरणाचा वापर करता येणार आहे. यावर अधिक संशोधन करून हा किरण अधिक पातळ करण्याचा विचार शास्त्रज्ञ करत आहेत. हे संशोधन नुकतेच जर्नल ऑप्टिक्स एक्स्प्रेसमध्ये प्रकाशित झाले आहे.