औरंगाबाद – दहशतवाद्यांनी संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. काल मध्य प्रदेशातील खांडवा येथील कारागृहातून पसार झालेले सिमीचे संशयित दहशतवादी औरंगाबाद शहरात येण्याची शक्यता आहे. सहा महिन्यांपूर्वी याच गुन्हेगारांनी औरंगाबाद एटीएसला धमकीचे पत्र पाठवले होते. या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा, एटीएस अधिक सतर्क झाली आहे.
ते सिमीचे गुन्हेगार औरंगाबाद शहरात येण्याची शक्यता
सिमी दहशतवादी संघटनेचा प्रमुख डॉ. अबू फैजलखान महंमद इम्रान खान याच्यासह सहा जण खंडवा येथील कारागृहातून पसार झाले. त्यामध्ये एजाजोद्दीन ऊर्फ एजाज ऊर्फ रियाज ऊर्फ राहुल महम्मद एजाजुद्दीन, अमजद रमजानखान, अस्लम ऊर्फ महम्मद अस्लम ऊर्फ सोहेब ऊर्फ बिलाल ऊर्फ संतोष महम्मद अय्युब, झकिर हुसेन सिद्धीकी ऊर्फ विकी डॉन ऊर्फ विनायककुमार बद्रुल हुसैन, मेहबूब गुड्डू मलिक इस्माईल यांचा समावेश आहे.
26 एप्रिल 2012 रोजी औरंगाबाद शहरातील हिमायतबाग येथे सिमीचे कार्यकर्ते बैठकीसाठी येत असल्याची माहिती एटीएसला मिळाली होती. त्यानंतर एटीएसचे पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, पोलिस निरीक्षक शिवा ठाकरे हे हिमायतबागेत गेले तेव्हा त्यांच्यावर गोळ्या झाडण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे रेड्डी व त्यांच्या सहकार्यांनी प्रत्युत्तर दिले, या चकमकीत खलील ऊर्फ अजहर अब्दुल वकील कुरैशी हा ठार झाला. तर महम्मद खलील ऊर्फ महम्मद शाकेर महम्मद अखिल हा पायाला गोळी लागल्याने जखमी झाला होता.
अबरार ऊर्फ मुन्ना अब्दुल्ला बाबूखाँ याला अटक करण्यात यश आले होते. ही घटना सिमीच्या जिव्हारी लागल्यानेच सहा महिन्यांपूर्वी एटीएसला निनावी पत्राद्वारे धमकी देण्यात आली होती. खंडव्याच्या कारागृहातून पळालेला सिमी’चा प्रमुख डॉ. अबू फैसलखान हे एकमेकांचे साथीदार आहेत. त्यांचे औरंगाबाद कनेक्शन आहे. त्यामुळेच पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. पसार झालेले गुन्हेगार औरंगाबाद मध्ये येऊ शकतात, असा पोलिसांचा अंदाज आहे.
