मनमाडमध्ये मांत्रिकाने केला माय लेकीवर बलात्कार

मनमाड- गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिलांवरील अत्याराच्या घटना सुरुच आहेत. त्यामध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. मनमाडमध्ये एका मांत्रिकाने पैसे दुप्पट करुन देण्याच्या आमीषाने बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी जादूटोणा विरोधी कायदा व बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक केली आहे.

मनमाडमधील आयेशा भागात राहणा-या महिलेला अश्फाक नामक भोंदूबाबाने गाठले. तिला पैसे दुप्पट करण्यासाठी भूताला प्रसन्न करुन देतो असे सांगितले. सोमवारी संध्याकाळी संबंधीत महिला व तिच्या मुलीवर अश्फाकने बलात्कार केला. अखेरीस रात्री उशीरा पिडीत मुलीने मनमाड पोलिसांकडे अश्फाकविरोधात तक्रार केली. पोलिसांनी जादूटोणा विरोधी कायदा व बलात्काराच्या आरोपाखाली अश्फाकला अटक केली आहे.

दुस-या घटनेत धुळे जिल्ह्यातील मोहाडी येथे एका अल्पवयीन मुलीवर तिच्या मित्रासह आठ जणांनी सामूहिक बलात्कार केला. गेल्या आठवड्यात पिडीत मुलीला तिच्या मित्राने निर्जनस्थळी नेले. यानंतर त्याने व त्याच्या सात मित्रांनी पिडीत मुलीवर बलात्कार केला. याप्रकरणी पिडीत मुलीने आठवडाभरानंतर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी सोमवारी उमेश कांगुर्डे आणि त्याच्या तीन मित्रांना अटक केली आहे.