चारा घोटाळा : नितीशकुमार लक्ष्य

पाटणा – चारा घोटाळ्यामध्ये लालूप्रसाद यादव आणि जनता दल (यू) पक्षाचे नेते जगदीश शर्मा यांना दोषी ठरविण्यात आले आहे. या खटल्याच्या निकालामुळे बिहारमधील भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या चेहर्‍यावर स्मितरेषा उमटली आहे. कारण लालूप्रसाद यादव हे त्यांचे कट्टर विरोधक होते आणि आता भाजपाच्या विरोधात असलेले नितीशकुमार हेही या प्रकरणात अडकू शकतात, असा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचा विश्‍वास आहे.

चारा घोटाळ्याचा निकाल लागल्यानंतर नितीशकुमार यांनी कसलीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. याचे विविध प्रकारचे अर्थ काढले जात आहेत. राज्याचे दोन माजी मुख्यमंत्री कधीही गजाआड जाऊ शकतात हे तर उघडच झाले आहे. पण विद्यमान मुख्यमंत्री सुद्धा कधी अडचणीत येतील सांगता येणार नाही, कारण ते सुद्धा या प्रकरणात गुंतलेले आहेत असे भाजपाचे प्रवक्ते राजीव प्रताप रुडी यांनी म्हटले आहे.

एका जनहित याचिकेमध्ये नितीशकुमार यांना आरोपी करण्यात आलेले आहे, अशी माहिती रुडी यांनी दिली. परंतु या माहितीचे तपशील सांगण्यास त्यांनी नकार दिला. लालूप्रसाद यांचे चारा घोटाळा प्रकरण भाजपाच्या सुशीलकुमार मोदी यांच्यामुळेच उघड झालेले आहे, असेही ते म्हणाले. चारा घोटाळ्याचा मुख्य आरोपी शामबिहारी सिन्हा हा आता हयात नाही. परंतु त्याने नितीशकुमार यांना एक कोटी ४० लाख रुपये दिले असून ही गोष्ट जनहित याचिकेत नमूद करण्यात आली आहे.

Leave a Comment