नवी दिल्ली – सर्वसामान्य नागरिक वाढत्या महागाईने हैराण झाले असतानाच सोमवारी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात 3.05 रुपयांनी कपात केली तर डिझेलच्या किमतीमध्ये 50 पैशांनी वाढ केली. हे नवे दर सोमवारी मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत. मुंबईत पेट्रोलचा नवा दर प्रतिलिटर 79.49 रुपये असेल, तर डिझेलचा नवा दर प्रतिलिटर 59.86 रुपये इतका असेल.
विनाअनुदानित गॅसच्या दरामध्ये 69 रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे हा गॅस 1021 रुपयांना मिळणार आहे. पेट्रोलच्या दरामध्ये करण्यात आलेल्या कपातीमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला असला तरी डिझेल व विनाअनुदानित गॅसच्या दरात वाढ केल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार आहे. पेट्रोल दरात 3 रुपये 05 पैशांनी घट झाली आहे. मात्र डिझेलमध्ये 50 पैशांनी वाढ झाल्याने, कही खुशी कही गम अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू होतील. या महिन्यात 13 तारखेलाच पेट्रोलमध्ये तब्बल दोन रुपयांनी वाढ झाली होती. त्यामुळे महागाईने ग्रासलेल्या जनतेला हा आणखी धक्का होता. मात्र आता पेट्रोल दर तीन रुपयांनी उतरल्याने थोडा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसात डॉलरच्या तुलनेत रूपया सुधारला आहे. तसंच आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या किंमतीही कमी झाल्या आहेत. त्यामुळे पेट्रोल दरात कपात झाल्याचं सांगण्यात येत आहे.