मुरबाड हेलिकॉप्टर अपघात, पाच ठार

मुरबाड – मुरबाड तालुक्यातील नाणेघाटातील डोंगरांचा अडथळा चुकवताना रविवारी सकाळी युनायेड हेलिचार्टर्स या कंपनीचे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की एका प्रवाशाचा होरपळून कोळसा झाला.

जुहू विमानतळावरून सकाळी सव्वाआठच्या सुमारास उड्डाण केलेल्या बेल 212फ या हेलिकॉप्टरमध्ये तीन वैमानिक, एक अभियंता आणि एक तंत्रज्ञ, असे एकूण पाच जण होते. हेलिकॉप्टरचे वैमानिक कॅप्टन सुरेंद्रसिंग भदोरिया, कॅप्टन अ‍ॅलन मार्टिन, कॅप्टन अन्शू माटा, अभियंता यतिन वाकडे आणि तंत्रज्ञ डीन डिसूझा हे नागपूरला निघाले होते. हेलिकॉप्टर नागपूरला सकाळी सव्वानऊ वाजता पोहोचण्याआधी औरंगाबादला इंधन भरून घेणार होते. \
\
या हेलिकॉप्टरचे सोमवारी सकाळी, चार्टर बुकिंगफ झाले होते. यासाठी हे सर्व कर्मचारी नागपूरला निघाले असताना ही दुर्घटना झाली, असे युनायटेड हेलिचार्टर्सफ या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. के. बालाकृष्णन यांनी प्रहारफशी बोलताना सांगितले. हेलिकॉप्टरचा ब्लॅक बॉक्सफ सापडल्यानंतरच अपघाताचे निश्चित कारण समजेल. नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाचे (डीजीसीए) वरिष्ठ अधिकारी सोमवारी घटनास्थळी जाणार आहेत, असे ते म्हणाले.

युनायटेडफने भारतात 1995पासून या सेवेत प्रवेश केला. आयएसओ 9001:2008फ प्रमाणपत्र मिळालेल्या या कंपनीने आत्तापर्यंत तब्बल 47 हजार तास अपघातविरहित सेवा दिल्याबद्दल बेल हेलिकॉप्टरफ कंपनीने युनायटेडफचा गौरव केल्याची माहिती बालाकृष्णन यांनी दिली.