नवी दिल्ली – भाजपाचे नेते नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतल्या आपल्या विशाल विकास रॅलीत पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या राहुल गांधी यांनी केलेल्या निर्भत्सनेचा विषय उपस्थित केला. अमेरिकेत असलेल्या मनमोहनसिंग यांना तिथे उपस्थित असलेले पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ हे अपमानास्पद वागणूक देतात कारण आपल्या पंतप्रधानांना त्यांच्या कॉंग्रेस पक्षातच मान दिला जात नाही असे मोदी यांनी म्हटले.
मोदी यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्यावरही टीका केली. दिल्लीत त्यांच्या कुप्रशासनामुळेच मुलींची आणि महिलांच अब्रु धोक्यात आली आहे असे मोदी म्हणाले.एनडीएच्या सहा वर्षांच्या कार्यकाळात सहा कोटी तरुणांना रोजगार मिळाला पण युपीएच्या दहा वर्षाच्या काळात केवळ ३० लाख युवकांनाच रोजगार मिळाला असे मोदी यांनी प्रतिपादन केले.
चीनने केलेली प्रगती किती वेगवान आहे आणि युपीए सरकारच्या कमी वेगामुुळे भारत किती मागे आहे याची तुलना करताना मोदी यांनी चीनमध्ये दरसाल ११ हजार किलोमीटर नवे रेल्वे मार्ग टाकले गेले असल्याचे सांंगितले. भारतात मात्र या काळात केवळ तीन हजार किलो मीटर मार्ग टाकला गेला आहे असे त्यांनी नमूद केले. भारताचा मोठा भाग आजही विजेविना जगत आहे याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला.
पीएम ‘सरदार‘ पण, ‘असरदार‘ नाहीत!
सभेला मोठ्या संख्येनं आलेल्या नागरिकांचे मोदींनी आभार मानले. मोदी म्हणाले, की दिल्लीनं एवढी विराट सभा पाहिली नसेल. दिल्लीमध्ये एवढी सरकार आहेत, की कळतच नाही. दिल्लीमध्ये एक आईचं, तर एक मुलाचं शासन आहे. दिल्लीत एकाचवेळी अनेक जण राज्य करतात. पण तरीही दिल्लीचा कोणी वाली नाहीय. संयुक्त पुरोगामी आघाडीतील घटक पक्ष आपापले सरकार चालवत आहे. त्यांचा एकमेकांमध्ये ताळमेळ नाही.
पंतप्रधान सरदार आहेत, पण ‘असरदार‘ आहेत. देशात सर्वात सुखी मुख्यमंत्री दिल्लीचे आहेत. सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांना रिबीन कापण्याशिवाय दुसरं काम नाही. त्यांना कोणतंच मंत्रालय पहावं लागत नाही. दिल्लीत बलात्काराच्या घटना घडल्यानंतर मुख्यमंत्री म्हणतात मुलींनी रात्री लवकर घरी यावे. पंतप्रधान सध्या अमेरिकेत आहेत. त्यांनी ओबामांसमोर देशाच्या गरीबीचं प्रदर्शन करुन भारताचं नाक कापलं, अशी टीका मोदींनी पंतप्रधानांवर केली.