कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव शिवसेनेत

औरंगाबाद – मनसेचे कन्नड येथील आमदार हर्षवर्धन जाधव शिवसेनेच्या वाटेवर आहेत. आगामी काळात मुंबईतील दसरा मेळाव्यात ते शिवसेनेत अधिकृतपणे प्रवेश करणार असल्याचे समजते. या संदर्भात आमदार जाधव यांनी बुधवारी दुपारी मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्या वेळी त्यांनी पक्षप्रवेशाबाबत चर्चा केली असल्याचे समजते. त्यांच्या या प्रवेशामुळे आता कन्नड तालुक्यातील राजकीय घडमोडींना वेग आला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आमदार जाधव यांनी मातोश्रीवर भेट घेऊन प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली. आमदार जाधव यांनी या घटनेला दुजोरा दिला. ठाकरे यांच्याशी सुमारे अर्धा तास चर्चा झाली व १३ ऑक्टोबर रोजी होणा-या दसरा मेळाव्यात प्रवेश करणार आहे ,’ असे सांगितले. ‘ मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार नव्हतो. मुख्यमंत्र्यांच्या वेरूळ दौ-यात पोलिसांकडून मारहाण झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल नाराजी होतीच. माझ्या मतदारसंघासाठी निधी देण्याचा शब्द त्यांनी दिला होता. मात्र सहा महिन्यात काहीच झाले नाही ,’ असे ते म्हणाले.

फेब्रुवारीमध्ये विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा दिला होता. मात्र अजित पवार यांच्या मध्यस्थीने २४ तासात राजीनामा परत घेतला. शिवसेनेतील प्रवेशामुळे त्यांचा प्रवास काँग्रेस ते मनसे व्हाया शिवसेना असा त्यांचा प्रवेश झाला आहे. विद्यमान आमदार हर्षवर्धन जाधव शिवसेनेत आल्यामुळे मातब्बर इच्छूकांची गर्दी वाढली आहे. त्यांच्या या प्रवेशामुळे आता कन्नड तालुक्यातील राजकीय घडमोडींना मात्र वेग आला आहे.