सिरीयात झाला होता रासायनिक अस्त्रांचा वापर

न्यूयॉर्क, – सिरीयाची राजधानी दमास्कसजवळ ऑगस्ट महिन्यात करण्यात आलेल्या रासायनिक अस्त्रांच्या हल्ल्यात शेकडो नागरिक मृत्युमुखी पडले होते. याविषयी संयुक्त राष्ट्र संघाने आपले पथक पाठवून याठिकाणी रासायनिक अस्त्रांचा वापर झाला आहे की नाही, याबाबत चौकशी केली होती. त्यावरून सिरीयामध्ये सुरू असलेल्या संघर्षात मोठ्या प्रमाणावर रासायनिक अस्त्रांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला गेला आहे, असे संयुक्त राष्ट्रसंघाने सोमवारी आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे.

या पथकाने रविवारी संयुक्त राष्ट्रसंघाला सादर केल्यानंतर, सोमवारी यूएनचे सरचिटणीस बान की मून सिरीयातील हल्ल्याबाबत अहवाल सादर केला. यामध्ये रासायनिक अस्त्रांचा मोठ्या प्रमाणात वापर झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, या अहवालात सिरीयातील बशर-अल-असद यांचे सरकार किंवा बंडखोर या दोन्ही बाजूंवर ठपका ठेवण्यात आलेला नाही.

या रासायनिक हल्ल्याचा बान की मून यांनी निषेध केला आहे. हा युद्ध गुन्हा आहे, असेही मून यांनी म्हटले आहे. सिरीयातील सध्याच्या राजवटीने रासायनिक अस्त्रे नष्ट करण्याचे वचन पाळले नाही, तर त्याविरुद्ध कारवाई करण्याचे आवाहनही मून यांनी सुरक्षा परिषदेला केले आहे.