मुजफ्फरनगरमधील तणाव निवळला

मुजफ्फरनगर – उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमध्ये झालेल्या जातीय दंगलीनंतर परिस्थिती नियंत्रणात आल्याने लष्कराच्या जवानांना आज मंगळवारी हटविण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा दंडाधिकारी कौशल राज शर्मा यांनी दिली.

मुजफ्फरनगरमध्ये झालेल्या दंगलीला आठवडा पूर्ण झाला असून जनजीवन पूर्वपदावर येत आहे. येथील संचारबंदीही उठविण्यात आली आहे. दंडाधिकारी राज शर्मा यांनी सांगितले की, परिस्थिती नियंत्रणात आल्याने लष्कराच्या जवानांना हटविण्यात आले आहे. त्यांच्याऐवजी निमलष्करी दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले आहे. सध्या आमचा नागरिकांमध्ये विश्‍वास निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. परिस्थिती पाहता सर्व भागातील संचारबंदी उठविण्यात आली आहे.निमलष्करी दलाच्या पाच तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत.

दंगलग्रस्त मुजफ्फरनगरला पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी भेट दिली. यावेळी पंतप्रधनांनी दोषींना कठोर शासन करण्यात येणार असल्याचे सांगितले.