नवी दिल्ली – दिल्लीच्या मेट्रो रेल्वेंच्या डब्यांचा वापर देह विक्रयासाठी केला जातो असे आरोप करण्यात आल्यामुळे निर्माण झालेली खळबळ अजून शांत होत नाही तोच या रेल्वेच्या स्थानकावरील वॉश रूम्स्च्या गैरवापराचे प्रकरण पुढे आले आहे. अशा वापराचे स्टिंग ऑपरेशन करून तयार करण्यात आलेली चित्रफित वृत्तवाहिनीवर दाखविण्यात आल्यामुळे मेट्रो रेल्वेच्या अधिकार्यांना खुलासा करण्याचीसुध्दा सोय राहिलेली नाही.
दिल्ली मेट्रोतील अनुचित व्यवहार अजून जारी
दिल्ली मेट्रो रेल्वेच्या डब्यामध्ये गर्दी नसण्याच्या काळात अनैतिक शरीर संबंधांचे व्यवहार चालतात. त्यांचे त्यांचे चित्रीकरण करून ती दृश्ये मोबाईल फोन्सवर प्रसारित करण्यात आली होती. ती लाखो लोकांनी पाहिल्यामुळे मेट्रो रेल्वेची बरीच बदनामी झाली. मात्र त्यापासून काहीच धडा न शिकल्यामुळे रेल्वे स्टेशनचा कारभार असाच जारी राहिला आणि आता त्यातून नवे प्रकरण उद्भवले आहे.
रेल्वे स्थानकावरील स्वच्छता गृहांना जोडलेल्या वॉश रूम्स्मध्ये स्वच्छता गृहाच्या कर्मचार्यांनी झोपण्याची व्यवस्था केलेली आहे. अशा व्यवस्था असलेल्या खोल्या एकांताच्या शोधात असलेल्या जोडप्यांना भाड्याने देण्याचा व्यवहार तिथे राजरोसपणे सुरू आहे. अशा जोडप्यांकडून स्वच्छता गृहाचे कर्मचारी एकावेळी ३०० ते ५०० रुपये मागतात आणि निरुपाय झालेली ही जोडपी तेवढे पैसे देऊन एकांताच्या क्षणासाठी या खोल्यांचा वापर करतात.
दोन दिवसांपूर्वी झी मीडियाच्या एका बातमीदाराने बनावट ग्राहक बनून ही खोली भाड्याने घेतली आणि भाड्याच्या देण्याघेण्याचा व्यवहार सुरू असतानाच त्याचे चित्रिकरण केले. हे चित्रिकरण केलेली ध्वनीचित्रफित वृत्तवाहिनीवर दाखविण्यात आली आहे. या खोल्यांची देखभाल करण्याचे काम खाजगी संस्थांना देण्यात आलेले आहे. त्यामुळे या गैरव्यवहारांशी रेल्वेच्या कर्मचार्यांचा काही संबंध नाही. मात्र तरीसुध्दा अशा खाजगी कंत्राटदारांवर योग्य ती कारवाई केली जाईल असे मेट्रो रेल्वेच्या अधिकार्यांनी जाहीर केले आहे.
