अडवाणींच्या मुलीचा मोदींना विरोध

नवी दिल्ली- भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींचा मोदींना थेट विरोध नसून त्यांच्या मुलीचा म्हणजे प्रतिभा अडवाणी यांचा मोदींना विरोध आहे. हे आता उघड झाले असून मुलीमुळेच गेल्या काही दिवसांपासून अडवाणी मोदींविरोधात भूमिका घेत असल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली. त्यामुळे आता काही दिवसांपासून चर्चेत असलेला हा वाद वेगळयाच वळणावर पोहचला आहे. अडवाणी यांच्या जवळच्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार प्रतिभा यांना राजकारणात जास्त रुची असल्याचे समजते.

पक्षाच्या जडणघडणीत प्रतिभा अडवाणी यांचे नाव फारसे कधी चर्चेत आलेले नाही. मात्र मोदी अडवाणी वादामुळे प्रतिभा अडवाणी यांचे नाव पक्षाच्या वर्तुळात चर्चिले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गोवा येथे झालेल्या भाजपच्या कार्यकारणी बैठकीच्या वेळी अडवाणी उपस्थित राहणार होते. मात्र प्रतिभा यांनी त्यांना तसे करण्यापासून रोखले. त्यामुळेच अडवाणी गोवा येथे हजर राहिले नव्हते, अशी चर्चा भाजपच्या नेत्यांमध्ये आहे.

गेल्या काही दिवसांपासून प्रतिभा या अडवाणींना आरएसएस आणि मोदी यांच्या विरोधात भडकवत आहेत. सुषमा स्वराज आणि अनंत कुमार यांनी देखील अडवाणी यांना गोवा येथे येण्यापासून रोखण्यासाठी प्रतिभाला साथ दिली होती अशी चर्चा आहे. अर्थात सुषमा आणि अनंत कुमार हे मोदींच्या नावाला फारसा विरोध करत नाही. मात्र प्रतिभा अडवाणीं मोदींना विरोध करतात आणि त्याच अडवाणींना मोदींसोबत जाण्यास रोखतात, असेही सूत्रांनी सांगितले.

Leave a Comment