नवी दिल्ली- गेल्याव काही दिवसांपसून कांद्याचे भाव गगनाला भिडल्याने त्याचा परिणाम महागाई वाढवण्यास झाला आहे. ऑगस्टमध्ये महागाई दर ६.१ टक्क्यांवर गेला असून गेल्या सहा महिन्यांतील उच्चांकी पातळी ठरली. कांद्याच्या किमतींनी महागाईने डोके वर काढले असून रिझव्र्ह बँकेचे आगामी पतधोरणात व्याजदर कपात करण्याचे वांदे झाले आहेत.
गेल्या ऑगस्ट महिन्यात कांद्याचे भाव तब्बल २४५ टक्क्यांनी वाढले. कांद्याच्या किमतीमधील ही आतापर्यंतची सर्वाधिक वाढ ठरली. गेल्या वर्षाच्या तुलनेत या महिन्यात भाजीपाल्याच्या किमतीत ७७.८१ टक्क्यांची वाढ झाली. त्याचबरोबर अन्नधान्याच्या किमतीतही १८.८ टक्क्यांची वाढ झाली. ज्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी चाट बसली आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये महागाईचा दर ८.०१ टक्के होता. तर चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तीन महिन्यांमध्ये महागाईदरात घसरण झाली होती.
दरम्यान, गेल्या काही दिवसांत बटाटे १५ टक्क्यांनी आणि डाळींच्या किमती १४ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. त्याचबरोबर साखरेच्या किमतीत ४.२ टक्क्यांनी आणि खाद्यतेलाच्या किमतीत ३.८६ टक्क्यांनी घट झाली आहे. मान्सून चांगला झाल्यामुळे येत्या काही महिन्यांमध्ये महागाईचा पारा खाली येईल, असा विश्वास पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष सी. रंगराजन यांनी व्यक्त केला आहे. तर अन्नधान्यातील महागाईची झळ सर्वसामान्यांना बसत असून ती कमी करण्यासाठी पुरवठा वाढवण्यावर भर देणे आवश्यक असल्याचे फिक्कीचे महासचिव दिदार सिंग यांनी म्हटले आहे.