झर्‍याचे पाणी आरोग्याला घातक

वॉशिंग्टन – झर्‍याचे पाणी दिसायला तर स्वच्छ दिसते. डोंगराच्या कपारीतून झिरपत येणारे असे पाणी दिसले की लोकांना ते पिण्याचा मोह आवरत नाही. काही पर्यटक जंगलात किंवा डोंगराळ प्रदेशात पर्यटनाला गेले की अशा झर्‍याच्या पाण्याच्या बाटल्या भरून नेतात. ते पाणी काही लोकांसाठी पवित्रही असते पण, आता या पाण्याचे परीक्षण करण्यात आले आहे. या परीक्षणात हे पाणी आरोग्याला घातक असल्याचे दिसून आले आहे. युनव्हर्सिटी ऑफ व्हिएन्ना या विद्यापीठातल्या एका संशोधन प्रयोगशाळेत या पाण्याचे नमुने तपासण्यात आले.

ऑस्ट्रीयाच्या निरनिराळ्या ठिकाणचे २१ आणि व्हिएन्नाच्या आसपासचे १८ झर्‍यांचे नमुने गोळा करून तपासले असता त्या पाण्याच्या एक मिलीमीटरमध्ये ६२ हजार जंतू आढळले. हे पाणी ख्रिश्‍चन लोकांत नामकरण विधीच्या वेळी पवित्र जल म्हणून वापरले जात असते. पण ते पवित्र नसून अतीशय घातक असल्याचे या प्रयोगात आढळले आहे. त्यात इ. कोली सारखे घातक जंतू असल्याचेही निष्पन्न झाले आहे.

या पाण्यामुळे अनेक प्रकारचे रोग होण्याची शक्यता असते. डायरिया, पोटशूळ असे विकार जडू शकतात. त्यामुळे ताप येऊ शकतो. पण तरीही ते पाणी धार्मिक विधींत शुद्ध आणि पवित्र म्हणून वापरले जाते. या पाण्यावर करण्यात आलेल्या प्रयोगांची माहिती जर्नल ऑफ वॉटर अँड हेल्थ या नियतकालिकांत प्रसिद्ध करण्यात आली आहे.