जर्मन बेकरी प्रकरणाची मुळातून फेरचौकशी होणार

मुंबई – पुण्याच्या जर्मन बेकरीत झालेल्या स्फोटात बीडच्या हिमायत बेगला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली असली तरीही उच्च न्यायालयाने सांगितल्यास राज्य सरकार या प्रकरणाची मुळातून फेरतपासणी करायला तयार आहे असे राज्य सरकारच्या गृह खात्याच्या सूत्रांनी म्हटले आहे. केन्द्रीय गुप्तचर यंत्रणांनी अटक केलेला इंडियन मुजाहेदीनचा संस्थापक यासीन भटकळ याने दिलेल्या माहिती वरून या प्रकरणाला हे नवे वळण लागले आहे. जर्मन बेकरीत घडवण्यात आलेला स्फोट हिमायत बेगने घडवला नसून तो आपण स्वत:च घडवला असल्याचे यासीन भटकळने पोलिसांना सांगितले म्हणून फेरचौकशीची गरज वाटत आहे.

हा स्फोट आपण घडवला असून त्यासाठी कातील सिद्दिकी याचा वापर केला होता. हा कातील नंतर येरवड्याच्या कारागृहात तिथल्या काही कैद्याकडून मारला गेला. या प्रकरणाशी हिमायत बेगचा काही संबंध नाही असे भटकळचे म्हणणे आहे पण दरम्यान या प्रकरणात हिमायत बेगला आरोपी समजून त्याला सजाही सुनावण्यात आली आहे. त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली असून त्याने या शिक्षेच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

उच्च न्यायालयात आपली बाजू मांडताना हिमायत बेगनेही आपला या स्फोटाशी काही संबंध नसल्याचे म्हटले असून आपल्याला या प्रकरणात जबरदस्तीने गोवले गेले असल्याचे म्हटले आहे. त्याच्या या म्हणण्याशी सुसंगत अशीच साक्ष भटकळने दिली असल्याने आता हिमायम बेगच्या या प्रकरणातल्या सहभागाची मुळातून चौकशी करावी लागणार आहे. उच्च न्यायालयाला तशी गरज वाटली आणि न्यायालयाने या फेरचौकशीचे आदेश दिले तर सरकार फेरचौकशी करायला तयार असल्याचे शासनाच्या प्रतिनिधींनी म्हटले आहे.