तामिळनाडूत आता स्वस्त मिनरल वॉटर

चेन्नई – तामिळनाडूत सत्ताधारी अण्णाद्रमुक पक्षाने स्वस्त धान्य, स्वस्त इडली आणि स्वस्त भाज्यांच्या पाठोपाठ आता स्वस्त मिनरल वॉटर उपलब्ध करून देण्याचा उपक्रम सुरू केला असून या अम्मा वॉटरची एका लीटरची बाटली १० रुपयांना द्यावयास सुरूवात केली आहे. राज्याच्या परिवहन खात्याने सुरू केलेेल्या स्वस्त मिनरल वॉटरच्या प्लँटचे उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री जयललिता यांनी ही घोषणा केली. याच कार्यक्रमात त्यांनी किलोमागे ६० रुपये दर लावलेल्या स्वस्त चिंचेच्या विक्रीचेही उद्घाटन केले.

चेन्नई जवळ गुम्मुडी पुंडी येथे हा प्लँट सुरू करण्यात आला आहे. त्यात दररोज तीन लाख लीटर्स पाणी फिल्टर केले जाईल. या प्रकल्पाचे उद्घाटन जयललिता यांनी चेन्नईत बसून व्हिडियो कॉन्फरन्सिंगच्या साह्याने केले. उद्घाटन झाल्यानंतर त्यांनी परिवहन मंत्र्यांकडून पहिली बाटली खरेदी केली. रेल्वेत पाण्याची बाटली १५ रुपयांना विकली जाते. खाजगी उत्पादक ती २० रुपयांना विकतात पण तामिळनाडूतले हे स्वस्त पाणी १० रुपयांना मिळेल. ते प्रामुख्याने बस स्थानकांवर आणि लांब पल्ल्याच्या बस गाड्यांत मिळेल.

सरकारने राज्यात एक रुपयाला इडली, पाच रुपयांना सांबार भात, तीन रुपयांना दही भात अशा अनेक स्वस्त अन्नाच्या योजना सुरू केल्या आहेत. गरीब कुटुंबांना स्वस्तात धान्य देण्याची योजना तर या आधीच्या द्रमुक सरकारनेच सुरू केली आहे. ती जयललिता यांनी जारी ठेवली आहे आणि त्यात अनेक उपक्रमांचा अंतर्भाव केला आहे. त्यातच स्वस्त भाज्याही विकल्या जात आहेत. आता त्यात स्वस्त मिनरल वॉटरची भर पडली आहे.

Leave a Comment