छेडाछेडीला कंटाळून जोडप्याची आत्महत्या

भोपाळ – मध्य प्रदेशातल्या दातिया जिल्हयातील भंडेर गावी नोकरी करणार्‍या एका परिचारिकेने आणि तिच्या पतीने गावातल्या गुंडांच्या छेडाछेडीला कंटाळून आत्महत्या केल्याने या परिसरात खळबळ उडाली आहे. गावातले गुंंड आपला पाठलाग करतात आणि आपल्यावर अश्‍लिल कॉमेंट करतात अशी तक्रार या परिचारिकेने आणि तिच्या पतीने स्थानिक पोलीस ठाण्यात नोंदली होती पण तिच्यावर पोलिसांनी काहीही कारवाई केली नाही. परिणामी त्रासाला कंटाळून या जोडप्याने आत्महत्या केली.

या संंबंधात पोलिसांची बेपर्वाई इतकी आहे की या संबंधात आधीच दाखल झालेल्या फिर्यादीच्या आधारे त्या गुंंडांवर कारवाई करण्याऐवजी त्यांनी घरगुती भांडणातून झालेली आत्महत्या असा गुन्हा नोंदला असून गुंडांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न चालविला आहे. पत्रकारांनी या बाबत स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांंना या प्रयत्नाचे दर्शन घडले.

पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यांनी या आत्महत्येचा आणि छेडछाडीचा काही संबंध नाही असे सांगून हात झाडले. या परिचारिकेचा पती तिला छळत असे. दोघांचे पटत नव्हते. त्यातून या दोघांनी आत्महत्या केली असल्याचे या अधिकार्‍याने सांगितले पण, ‘पती पत्नीला छळत असल्याने आत्महत्या झाली असेल तर एकटी पत्नीच आत्महत्या करील दोघे मिळून कशाला जीव देतील ?’ या प्रश्‍नावर हा अधिकारी निरुत्तर झाला.