अखिलेश यादव यांचे काळ्या झेंड्यांनी स्वागत

मुजफ्फरनगर – उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री अखिलेशसिंग यादव यांनी काल दंगलग्रस्त मुजफ्फरनगरला भेट दिली. ही दंगल ज्या कवल गावात झालेल्या तिघांच्या हत्यांतून सुरू झाली त्या गावाला मुख्यमंत्र्यांनी आधी भेट दिली. तेव्हा तिथल्या काही लोकांनी त्यांना काळे झेंेडे दाखवले आणि अखिलेश परत जा अशा घोषणा दिल्या. सरकारने ही दंगल नीट हाताळली नसल्याचा त्यांचा आरोप होता. शिवाय मुख्यमंत्र्यांनी त्यांचे निवेदन स्वीकारण्यास नकार दिल्याचाही राग त्यांच्या मनात होता.

ही दंगल झाल्यानंतर आठवड्याने ते या गावाला आले असल्याने लोकांत काही प्रमाणात नाराजी पसरली होती पण त्यांना मुख्यमंत्र्यांनी शांत केले. मुख्यमंत्र्यांनी, दंगलीमुळे गाव सोडून पळालेल्या लोकांना परत येण्याचे आवाहन केले. घडलेला प्रकार फार दुर्दैवी असल्याचे सांगतानाच त्यांनी या प्रकाराची चौकशी केली जाईल असे आश्‍वासनही दिले. उत्तर प्रदेशातली ही दंगल २००२ सालच्या गुजरात दंंगलीसारखी होती का असा प्रश्‍न विचारला असता अखिलेश यांनी, या दोन दंगलींची तुलना होऊ शकत नाही असे प्रतिपादन केले.

या दंगलीचे कोणीही राजकारण करू नये . समाजवादी पार्टी असे राजकारण कधीच करीत नाही असेही ते म्हणाले. या दंगलग्रस्त भागाला पंतप्रधान मनमोहनसिंग हेही भेट देणार आहेत. त्याच्या आधी अखिलेशसिंग यांनी भेट दिली. पंतप्रधानांसमोर या दंगलीचा योग्य तो संदेश जावा या हेतूने त्यांनी पंतप्रधानांच्या आधी या भागाला भेट दिली असल्याचे मानले जात आहे.

Leave a Comment