अतिरिक्त पोलीस महासंचालक सहाय यांचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई – मलबार हिल येथे राहत असणारे राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आर. के. सहाय यांनी रविवारी मुंबईतील राहत्या घरी स्वत:ला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. यात ते 60 टक्के भाजले असून, त्यांना उपचारासाठी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

सहाय यांनी घरच्यांचे लक्ष नसताना स्वत:ला पेटवून घेतले. हा प्रकार कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ आग विझवली व सहाय यांना बॉम्ब हॉस्पिटलमध्ये आणले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. मलबार हिल पोलिस या घटनेची अधिक चौकशी करत असून, अद्यापही सहाय यांची जबानी घेण्यात आलेली नाही.

सहाय यांनी टोकाचे पाऊल का उचलले यावर विविध तर्क-विर्तक लढवले जात आहेत. काही दिवसांपूर्वीच सहाय यांनी आयपीएस अधिकारी दीपक कपूर यांच्या विरोधात अंतर्गत अहवाल दिला होता. या अहवालावरुन कपूर यांची चौकशी सुरु होती. सहाय यांची प्रकृती सुधारल्यानंतर त्यांची जबानी नोंदवण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.