जादुटोणा विरोधी अध्यादेशानुसार दोन भोंदुबाबांना अटक

नांदेड – बहुचर्चीत जादुटोणा विरोधी वटहुकुम जारी झाल्यानंतर नांदेडमध्ये या कायद्याअंतर्गत पहिली कारवाई करण्यात आली आहे. या कायद्याअंतर्गत आज (बुधवार) बुवाबाजी करणार्‍या दोन भोंदुबाबांना नांदेड पोलिसांनी अटक केली आहे. साहिल खान लियाकत आणि अमिरोद्दीन लतीफ अशी या दोन्ही भोंदुबाबांची नावे असून ते उत्तरप्रदेश येथील रहिवाशी आहेत.

या दोघांनी नांदेडमध्ये अंधश्रद्धेचे दुकान थाटले असून ते सर्व प्रकारच्या दुर्धर आजारांवर गंडा, ताविज याद्वारे उपचार करण्याचा दावा करीत नांदेडकरांना अंधश्रद्धेचा गंडा घालत होते. या भोंदुबाबांबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी स्वतःच सापळा रचून या भोंदुबाबांना अटक केली आहे.

हे भोंदुबाबा वर्तमान पत्रात जाहिरात देऊन आपले सावज हेरत होते. या जाहिरातीत एड्स, कँसरसारख्या दुर्धर अजारांवर उपचार, गृहक्लेश, व्यवसाय, लग्नात अडथळे, सवत अथवा वैर्‍यांपासून सुटका असा सर्व गोष्टींवरील उपचार देतो अशा प्रकरारच्या या जाहिराती होत्या.

विशेष म्हणजे या जाहिरातींना भुलून लोकंही या अंधश्रध्देला बळी पडत होते. पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यावर पोलिसांनी या भोंदुबाबांकडे एका पोलिसालाच रूग्ण म्हणून पाठवले. तर भोंदुबाबाने मंत्रतंत्र गंडे देताच पोलिसांनी या दोन्ही भोंदुबाबंना अटक केली.

हा भोंदुबाबा जादु टोण्याचे ढोंग उत्कृष्ठरित्या रचत असुन त्यासाठी त्याने सगळ्या प्रकारचे साहित्य जमवले होते. कुठल्याही आजारावर उपचार अन् कुठल्याही समस्येवरचे समाधान करतो असा त्याचा दावा होता. त्याच्या थापांना अनेक जण बळी पडल्याचेही पोलीस तपासात पुढे आले आहे

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर सरकारला जाग आली अन सरकारने जादुटोणा विरोधी वटहुकुम जारी केला. 26 ऑगस्ट रोजी राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर या वटहुकुमाचे कायद्यात रूपांतर झाले. परंतु अजून हा कायदा राज्याच्या सभागृहात पारीत होणे बाकी असले तरी तुर्तास हा कायदा अस्तित्वात आला आहे.