सेनेगल – पश्चिम आफ्रिकेतील सेनेगल येथे असलेल्या निकोलोकोबो नॅशनल पार्कमध्ये वटवाघळाच्या नव्या जाती सापडल्या. या पाचही जाती आफ्रिकेतील अन्य वटवाघळांपेक्षा आनुवंशिकदृष्टया भिन्न असल्या तरी त्यांच्या शरीराची ठेवण सारखीच आहे.
आफ्रिकेमध्ये सापडल्या वटवाघळाच्या पाच नव्या जाती
युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क, झेक युनिव्हर्सिटी, झेक रिपब्लिकमधील चार्ल्स युनिव्हर्सिटीमधील वैज्ञानिकांनी पश्चिम आफ्रिकेच्या जंगलामध्ये केलेल्या संशोधनामध्ये त्यांना अविश्वसनीय अशी वैविध्यपूर्ण जैविक संपत्ती आढळून आली. यामध्येच व्हेस्पर ही वटवाघळाची जातही सापडली आहे.
संशोधकांनी जवळपास 213 व्हेस्पर वटवाघळांचे निरीक्षण केले. यामध्ये त्यांना वटवाघळांच्या 10 जाती असल्याचे दिसून आले. यातील पाच वटवाघळांच्या जाती या आफ्रिकेमध्ये पूर्वापार वटवाघळांप्रमाणेच दिसून आल्या. पण त्यांच्या जनुकांचा सखोल अभ्यास केल्यानंतर त्या पाचही जाती पूर्वीच्या जातींपेक्षा आनुवंशिकरीत्या वेगळया असल्याचे दिसून आल्या.
या पाच जातींचा सखोल अभ्यास करून शास्त्रज्ञांनी त्यांना पीपीस्ट्रेलस हेस्परीडस, नायक्टीसेनॉप्स क्लिफेनी, स्कोटोस्कस हिरुंडो, निरोमिसिया नाना आणि निरोमिसिया सोमालिका अशी नावे दिली आहेत. या संशोधनामुळे पश्चिम आफ्रिकेमध्ये मोठया प्रमाणात जैविक संशोधनाला चालना मिळण्याची शक्यता असल्याचे यॉर्क युनिव्हर्सिटीचे जीवशास्त्र विभागाचे प्रमुख नॅन्सी इरविन यांनी सांगितले. हे संशोधन जीवशास्त्रासंदर्भातील फ्रंटियर्स या जनरलमध्ये प्रकाशित झालेले आहे.
