रॅगिंगला कंटाळून युवतीची आत्महत्या

नाशिक – एका बहुराष्ट्रीय कंपनीत ट्रेनी म्हणून काम करणार्‍या १९ वर्षांच्या युवतीने आपल्या सहकार्‍यांकडून होत असलेल्या छळाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केली. तिने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आपला छळ करणार्‍या सहकार्‍यांची नावे दिली असून पोलिसांनी त्या सर्वांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून अटक केली आहे.

बॉश कंपनीत हा प्रकार घडला. या युवतीचा छळ करणारे सर्व जण याच कंपनीत ट्रेनी म्हणून काम करीत होते. आत्महत्या करणार्‍या या युवतीचे नाव प्रणाली राहणे असे आहे. तिने आधी आपली मनगटाची शिर कापून घेण्याचा प्रयत्न केला आणि नंतर पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. तिने हा प्रकार आपल्या घरातच केला. तिच्या पालकांंनी तिला रुग्णालयात नेले पण तत्पूर्वीच तिचा प्राण गेला होता.

प्रणालीने आपल्या प्रशिक्षणात प्रगती केली होती आणि कंपनीने तिला जर्मनीत प्रगत प्रशिक्षणासाठी निवडले होते. तिचे अन्य सर्व सहकारी यासाठीच्या परीक्षेत नापास झाले होते. तेव्हापासून ते तिचा द्वेष करीत होते. तिला छळण्याचे ते एक कारण होते असे प्रणालीचे वडील प्रदीप यांनी पत्रकारांना सांगितले.

या संबंधात अटक करण्यात आलेल्यांमध्ये चार मुलीही आहेत. या सर्वांना भारतीय दंड संहितेच्या कलम ३०६ अन्वय रॅगिंगविरोधी कायद्याच्या कलम ४ खाली अटक करण्यात आली असून सात सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि रॅगिंग असे दोन आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत.