नवी दिल्ली : गेल्या १६ डिसेंबरला दिल्लीत एका बसमध्ये झालेल्या सामूहिक बलात्काराच्या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने आपला निकाल १० सप्टेंबर पर्यंत राखून ठेवला आहे. या प्रकरणात सहा आरोपी होते त्यातला एक आरोपी अल्पवयीन आहे. त्याला नुकतीच तीन वर्षे बाल सुधारगृहात राहण्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याच्यावरचा खटला बाल न्यायालयात चालला होता. उर्वरित पाच आरोेपींपैकी एकाने तुरुंगातच गळफास लावून आत्महत्या केली आहे.
दिल्ली बलात्कार प्रकरण : १० सप्टेंबरला निकाल
या चौघा आरोपींवर दिल्लीच्या विशेष द्रुतगती न्यायालयात खटला सुरू होता. त्याचे कामकाज आणि सुनावणी पूर्ण झाली आहे. या चौघांवर एका कॉलेज तरुणीला एकाकी बसमध्ये बेदम मारहाण करून तिच्यावर अमानुष सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. या प्रकारानंतर या तरुणीचे रुग्णालयात उपचार घेताना निधन झाले. त्यामुळे या चौैघांवर सामूहिक बलात्काराबरोबरच खुनाचाही आरोप लावण्यात आला आहे.
या घटनेनंतर देशभरात असंतोष पसरला. लोकांनी या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली. त्यामुळे न्यायालयाच्या दृष्टीकोनात काही बदल होऊन या आरोपींना किती कठोर शिक्षा सुनावली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
