रिझर्व्ह बँकेच्या हॉटसीटवर राजन विराजमान

मुंबई – आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ञ रघुरामन राजन आज म्हणजे ४ सप्टेंबर रोजी रिझर्व्ह बँकेच्या गर्व्हनरपदाची सूत्रे हाती घेत आहेत. डी सुब्बाराव यांच्याकडून ही सूत्रे राजन यांना दिली जात आहेत.

देशातील वाढती महागाई, रूपयाची घसरण, मंदावलेला विकास दर, आणि चालू खात्यातील वाढती तूट अशा पार्श्वभूमीवर गर्व्हनरपदाच्या हॉटसीटवर आलेले ५० वर्षीय राजन काय कामगिरी बजावतात याकडे केवळ देशाचेच नाही तर जगाचे लक्ष लागले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे माजी मुख्य अर्थतज्ञ म्हणून काम केलेले राजन यांनी अर्थमंत्रालयाचे सल्लागार म्हणूनही काम पाहिले आहे.

राजन यांनी यापूर्वीच देशापुढील आव्हाने चुटकीत सुटू शकणार नाहीत कारण आपल्याकडे जादूची किल्ली नाही असे स्पष्ट केले आहे. मात्र ही आव्हाने पार पाडण्यासाठी अनेक कल्पना आहेत आणि देशापुढील महत्त्वाच्या अडचणी सोडविण्यासाठी खूप कांही करता येणार असल्याचा दिलासाही दिला आहे. पायरीपायरीने सर्व समस्यांवर उपाय शोधले जातील असे सांगतानाच त्यांनी देश दररोज प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल अशी आशाही व्यक्त केली आहे.

यंदा देशात मान्सूनचा पाऊस समाधानकारक झाला आहे आणि निर्यातीत होत असलेली वाढ ही राजन यांच्या प्रयत्नांना हातभार लावणारी ठरेल असा या क्षेत्रातील जाणकारांचा अंदाज आहे.