वॉशिग्टन – अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी सिरीयावर अमेरिकेकडून केल्या जाणार्या लष्करी कारवाईसाठी रिपब्लीकन व डेमोक्रॅटिक नेत्यांचा पाठिबा मिळविण्यात यश मिळविले आहे. सिरीयावर आकाशमार्गे साठ दिवसांत कारवाई करण्याच्या ओबामा प्रशासनाच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली असली तरी सर्वसाधारण अमेरिकन नागरिकांनी मात्र सिरीयात लष्करी कारवाई करण्याच्या विरोधात मत व्यक्त केले आहे. वॉशिग्टन पोस्टने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात ही बाब स्पष्ट झाली आहे.
या संबंधी घेण्यात आलेल्या जनमत चाचणीत ५९ टक्के नागरिकांनी सिरीयावर अमेरिकेने मिसाईल हल्ला चढविण्यास विरोध दर्शविला आहे तर ३६ टक्के लोकांना ओबामा यांच्या लष्करी कारवाईच्या प्रस्तावास पाठिबा दिला आहे. मात्र ५४ टक्के डेमोक्रॅट, ५५ टक्के रिपब्लिकन व ६६ टक्के तटस्थ नागरिकांनी या हल्ल्याला विरोध केला आहे. सर्वेक्षणानुसार फ्रान्स व ब्रिटन या कारवाईत सामील झाले तर आणखी १० टक्के लोक लष्करी कारवाईच्या बाजूने वळू शकतील असे दिसून आले आहे.
ब्रिटीश पार्लमेंटने गेल्याच आठवड्यात सिरीयातील प्रश्नात हस्तक्षेप करण्याचा प्रस्ताव धुडकावून लावला आहे. त्या पार्श्वभूमीवर ७० टक्के अमेरिकन नागरिकांनी सिरीयातील विरोधी गटांना अमेरिकेने शस्त्र पुरविण्यासही विरोध दर्शविला आहे.