कडुलिंबापासून कर्करोग प्रतिबंधक औषध

कोलकाता – कोलकात्याच्या चित्तरंजन नॅशनल कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेतल्या संशोधकांनी कडुलिंबापासून कर्करोग प्रतिबंध औषध निर्माण केले आहे. ग्लायको प्रोटिन नावाचे हे औषध शरीरातली कर्करोग प्रतिबंधक शक्ती बळकट करण्यास उपयुक्त ठरू शकते. असा दावा या शास्त्रज्ञांनी केला असून या औषधाचे आंतरराष्ट्रीय पेटंट मिळवले आहे. या संस्थेतल्या संशोधकांनी गेली ७ वर्षे हे संशोधन सुरू ठेवले होते. त्यात त्यांना शेवटी यश आले आहे. या औषधाचे प्राण्यांवरील प्रयोग यशस्वी झाले आहे. त्याच्या रुग्णालयातील चाचण्या पूर्ण झाल्या आणि औषध प्रशासनाने त्याला मान्यता दिली की लवकरच हे औषध बाजारात उपल्बध होऊ शकेल असे या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

आपल्या अनेक वर्षांच्या प्रयत्नांना फळ आल्यानंतर या शास्त्रज्ञांनी आनंद व्यक्त केला. हे औषध वनस्पतीपासून तयार केले असल्यामुळे त्याचे कसलेही साईड इफेक्टस् होत नाही असे या संशोधन प्रकल्पाचे प्रमुख डॉ. रतिंद्रनाथ बराल यांनी सांगितले आहे. डॉ. बराल यांच्यासोबत या संशोधन प्रकल्पात २२ संशोधक काम करत होते आणि त्यामध्ये डॉक्टरेट करणार्‍यांचा समावेश होता.

या संशोधनाचा वापर करून बाजारात हे औषध आणण्याच्या बाबतीत अजून तरी कोणत्याही औषधी कंपनीने पुढाकार घेतलेला नाही. परंतु एकदा हे औषध उपयुक्त ठरू शकते अशी कंपन्यांची खात्री पटली की या दिशेने हालचाली होतील असा विश्‍वास या क्षेत्रातल्या तज्ञांनी व्यक्त केला आहे.