कोलकाता – कोलकात्याच्या पोलिसांनी शहरातील सोनागच्छी या वेश्या वस्तीमध्ये विकण्यात आलेल्या १५ वर्षाच्या बांगलादेशी मुलीची सुटका केली असून त्याच देशातल्या २१ वर्षे वयाच्या अब्दुल गफार या युवकाला अटक केली आहे. या मुलाने या अल्पवयीन मुलीस बांगलादेशातून पळवून आणले आणि तिच्याशी लग्न करण्याचे आमिष दाखूवन तिच्यासोबत तो काही दिवस राहिला. मात्र अल्पावधीतच त्याने तिला कोलकाताच्या वेश्या वस्तीतील एका कुंटणखान्यात विकून टाकले. ही गोष्ट कळताच पोलिसांनी छापा टाकून त्या मुलीची सुटका केली आणि तिने दिलेल्या माहितीच्या आधारावर या तरुणाला अटक केली.
अल्पवयीन बांगला मुलीची वेश्या वस्तीत विक्री
हा मुलगा बांगलादेशी असल्यामुळे त्याची फारशी माहिती पोलिसांना मिळू शकली नाही. मात्र त्याने या मुलीला बिरभूम आणि बर्द्वान या शहरांमध्ये बरेच दिवस फिरवले. असे त्या मुलीने सांगितले. अटक केलेल्या तरुणाला न्यायालयासमोर उभे करण्यात आले असून १४ दिवसांची कस्टडी मंजूर करून घेण्यात आली आहे.
बांगलादेशातून अशा काही मुली पळूवन आणल्या जातात आणि भारत-बांगला देश सीमेवरून असे युवक आणि युवती बिनधास्तपणे भारतात येऊ शकतात. नेपाळ आणि बांगला देशमधून आलेल्या अशा मुली कोलकात्याच्या वेश्या वस्तीत विकल्या जातात असे बरेच दिवसापासून लक्षात आलेले होते. त्यामुळे काही स्वयंसेवी संघटना अशा मुलींच्या मागावरच राहिल्या आणि त्यांनी या मुलीचे अपहरण उघड केले. त्यामुळे या अपहरणाचा छडा लागला.
