मंगळावर वस्तीसाठी ८ हजाराहून अधिक भारतीयांची नोंदणी

येत्या दहा वर्षात मंगळावर मानवी वसाहत निर्माण करण्याचे आश्वासन दिलेल्या मार्स वन प्रकल्पांतर्गत ८१०८ भारतीयांनी नोंदणी केली असल्याचे प्रलक्पाच्या प्रमुख आशिमा डोग्रा यांनी जाहीर केले आहे. मार्स वन ही डच स्वयंसेवी संस्था आहे. केवळ पैशांसाठी नाही तर माणसांना कायमस्वरूपी मंगळावर राहता यावे यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार २०२३ सालापर्यंत मंगळावर कायमस्वरूपी मानवी वसाहती स्थापन केल्या जाणार आहेत. मंगळावरील हवामान मानवी वस्तीसाठी योग्य आहे वा नाही हे अद्यापी स्पष्ट झालेले नसतानाही आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने मंगळावर वास्तव्य शक्य असल्याचा या संस्थेचा दावा आहे. मंगळावर कायम वस्तीसाठी जाऊ इच्छिणार्या् माणसांसाठी ३१ ऑगस्ट ही नोंदणीची शेवटची तारीख होती. या मुदतीत नोंदणी केलेल्यांत १४० देशांतील नागरिकांचा समावेश आहे असेही समजते.

पहिल्या दहा देशांत अमेरिकेतील ३७८५२, चीनमधील १३१२४, ब्राझीलमधील ८६८६, भारत ८१०८,रशिया ७१३८, ब्रिटन ६९९९, मेक्सिको ६७७१, कॅनडा ६५९३, स्पेन ३६२१ तर फिलिपिन्समधील ३५१६ नागरिकांचा समावेश आहे. या शिवाय अन्य १,६५००० लोकांनीही मंगळावर वास्तव्याची इच्छा वर्तविली आहे.

आगामी कांही वर्षात डेमॉन्स्टेशन मिशन, कम्युनिकेशन उपग्रह, दोन रोव्हर, व असंख्य कार्गो मिशन्स मंगळ मोहिमेत पार पाडली जाणार आहेत. यामधून मंगळावर माणूस राहू शकेल व काम करू शकेल अशी औट पोस्ट उभारली जाणार आहेत. मंगळावर जाण्याची तयारी असलेल्यांचे प्रशिक्षण यापूर्वीच सुरू करण्यात आले असल्याचेही डोग्रा यांनी यावेळी सांगितले.