रुपयाची घसरण ही चिंतेची बाब- पंतप्रधान

नवी दिल्ली- रुपया कोसळण्याची अनेक कारणे आहेत. देशाबाहेर घडणा-या घटनांमुळे रुपयावर परिणाम होत आहे. रुपयाची घसरण ही चिंतेची बाब आहे. या आर्थिक संकटाला देशाबाहेर घडणा-या घटना जितक्या जबाबदार आहेत तितक्याच जबाबदार काही देशातील अंतर्गत बाबीही असल्याचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी लोकसभेत निवेदन करताना सांगितले.

यावेळी पुढे बोलताना पंतप्रधान मनमोहन सिंग म्हणाले, ‘रुपया कोसळण्यास देशाबाहेर घडणा-या घटना जबाबदार आहेत. सीरियामधील संघर्ष, तणाव आणि अमेरिकेने घेतलेली आक्रमक भूमिका, तसेच तेलाच्या किंमतीत झालेली वाढ आणि अमेरिकेचे आर्थिक धोरण या सर्व घटकांचा परिणाम भारतीय रुपयावर झाल्याने रुपयाची घसरण होत आहे. मात्र आगामी काळात आर्थिक सुधारणांसाठी सरकार प्रयत्नशील आहे.’

यापुढील काळात देशभरातील कोणतीही विकासकामे न थांबवता परिस्थिती नियंत्रणात आणणार असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर आगामी काळात निर्यात वाढवण्यावर भर देणार असून आयातीत घट करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.