नवी दिल्ली – भारतातील अनेक स्फोटातील आरोपी अब्दुल करीम टुंडा याच्यावर हल्ला झाला. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाबाहेर सादर करण्यापूर्वी हिंदू सेनेच्या दोन कार्यकर्त्यांपैकी एकाने टुंडाला कानशिलात भडकावली. त्यानंतर दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.
हिंदू सेनेच्या कार्यकर्त्याने भडकावली टुंडाच्या कानशिलात
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने टुंडाला भारत-नेपाळ सीमेवरून अटक केली. त्यानंतर त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडीत पाठवण्यात आले होते. त्याची पोलीस कोठडी आज संपल्यानंतर पटियाला हाऊस कोर्टात सादर करण्यात आले. लष्कर-ए-तोएबाचा कथित अतिरेकी अब्दुल करीम टुंडाची सुनावणी इन-कॅमेरा करण्याचे पटियाला हाऊस कोर्टाने आदेश दिले आहेत. टुंडावर 33 फौजदारी आणि 40 स्फोटांचे आरोप आहेत.
मुंबईत 1993 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर टुंडाचे नाव पहिल्यांदा समोर आले. टुंडावर नवी दिल्ली, सोनीपत, लुधियाना, कानपूर आणि वाराणसीमध्ये डिसेंबर 1996 ते जानेवारी 1998 पर्यंत 40 हून अधिक बॉम्बस्फोटांचा कट रचल्याचा आरोप आहे.
