वॉशिंग्टन – अमेरिकेच्या नासा या संघटनेच्या शास्त्रज्ञांनी पुढारलेल्या देशातल्या हवेच्या प्रदूषणाचा तौलनिक अभ्यास केला असून भारतातली शहरे अमेरिका आणि यूरोपातल्या शहराच्या तुलनेत कमी प्रदूषित आहेत, असे दाखवून दिले आहे. औद्योगीकरण आणि त्याचे पर्यावरणावर होणारे परिणाम यांचा तपशीलात अभ्यास करून या शास्त्रज्ञांनी असे दाखवून दिले आहे की, भारतातल्या औद्योगिक शहरात झालेले हवाई प्रदूषण एकुणात जास्त असले तरी त्या शहरांच्या लोकसंख्येच्या तुलनेत ते यूरोपापेक्षा कमी आहे.
भारतातली शहरे तुलनेने कमी प्रदूषित
शहरात झालेले प्रदूषण आणि त्या प्रदूषणाचे दर दहा लाख लोकसंख्येमागे असलेले प्रमाण यांचा नासाने अभ्यास केला. तेव्हा असे आढळून आले की, यूरोप खंडातल्या कोणत्याही प्रदूषित शहरामध्ये झालेले प्रदूषण हे दरडोई निकषामध्ये भारतातल्या शहराच्या सहापट अधिक आहे. विशेषत: नायट्रोजन ऑक्साईड हा प्रदूषक घटक यूरोप खंडातल्या हवेमध्ये मोठ्या प्रमाणावर पसरलेला आहे.
हवेचे प्रदूषण करणार्या घटकांमध्ये नायट्रोजन ऑक्साईड हा सर्वाधिक घातक प्रदूषक आहे आणि औद्योगीकरणामध्ये निरनिराळ्या इंधनांचा वापर सातत्याने झाल्यामुळे या वायूचे हवेतले परिणाम वरचेवर वाढत आहे. त्यामुळे प्रदूषक घटकांचा अभ्यास करताना या वायूच्या प्रमाणावर लक्ष्य केंद्रित करण्यात आले. यूरोप, अमेरिका, भारत आणि चीन या चार ठिकाणचे प्रदूषण या प्रकल्पात अभ्यासण्यात आले.
