तांब्यामुळे अल्झायमर्समध्ये वाढ

वॉशिंग्टन – शरीरातल्या सूक्ष्म पोषण द्रव्यांमध्ये तांब्याचे प्रमाण वाढले तर ते तांबे मेंदूमध्ये डिपॉझीट होते आणि त्याचा मेंदूला होणार्‍या रक्ताच्या पुरवठ्यावर विपरीत परिणाम होऊन अल्झायमर्सचा विकार बळावू शकतो, असे एका संशोधनात आढळून आले आहे. युनिव्हर्सिटी ऑङ्ग रोसेस्टर मेडिकल सेंटरच्या न्यूरो सर्जरी विभागात हे संशोधन करण्यात आले आहे.

शरीरात आणि त्यातल्या मेंदूमध्ये तांब्याचे प्रमाण वाढले तर मेंदूत ऍमायलाईड बेटा नावाचे प्रोटिन मर्यादेपेक्षा जास्त होते. तांब्यामुळे मेंदूच्या पेशींमध्ये होणार्‍या प्रक्रियेतून या प्रथिनाची निर्मिती होत असते आणि हे प्रथिन मेंदूकडे होणार्‍या रक्ताच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण करते. उंदरावर करण्यात आलेल्या अनेक प्रयोगांमध्ये ही गोष्ट आढळून आली आहे.

काही वेळा आपण पीत असलेल्या पाण्यामध्ये तांब्याचे प्रमाण जास्त असू शकते आणि त्यातून आपल्या मेंदूला तांब्याचा पुरवठा होत असतो. त्यामुळे ही सारी प्रक्रिया होऊ शकते.