इराणच्या 1953 च्या बंडात सहभाग असल्याची सीआयएची कबुली

वॉशिंग्टन- इराणमध्ये, 1953 साली झालेल्या बंडात आपला सहभाग असल्याची जाहीर कबुली सीआयए या अमेरिकन गुप्तचर संघटनेने दिली आहे. आम्हंीच ब्रिटनच्या मदतीने तत्कालीन पंतप्रधान मोहंमद मोस्सादेक यांचे सरकार उलथवून लावण्यास चिथावणी दिली होती, असे या संघटनेने म्हटले आहे सीआयएची काही गुप्त कागदपत्रे जाहीर झाली असून त्यात ही कबुली देण्यात आली आहे.

काल अमेरिकेच्या नॅशनल सिक्युरिटी अर्काईव्ह संशोधन संस्थेने हंी कागदपत्रे जाहंीर केली त्यात सीआयएच्या या कबुलीचा समावेश आहे. संस्थेच्या वेबसाईटवर जाहीर झालेल्या या कागदपत्रांमध्ये, सीआयएने आपण ब्रिटनच्या साहाय्याने इराणमधील लोकनियुक्त सरकार कसे उलथवून लावले होते याची तपशीलवार माहिती देण्यात आली आहे. हंी गुप्त कागदपत्रे 2011 मध्येच खुली करण्यात आली होती आणि ती माहिती स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठाकडे सोपवण्यात आली होती.

इराणमधील त्या बंडात लष्कराने लोकनियुक्त सरकार बरखास्त करून स्वतःच्या हाती सत्ता घेतली होती. सीआयएच्या आदेशानुसारच तेथील लष्कराने हे कृत्य केले होते. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी कैरो येथे बोलताना अमेरिकेने इराणमध्ये घडवून आणलेल्या या बंडाची ओझरती माहिती दिली होती.