निवडणुकांत जातीयवादी शक्तींना पराभूत करा-पंतप्रधान

नवी दिल्ली -जातीयवादी शक्ती समाजाचे विभाजन करू शकतात. त्यामुळे अशा शक्तींना निवडणुकांत पराभूत करा, असे आवाहन आज पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी केले. या आवाहनातून त्यांनी भाजप आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केल्याचे मानले जात आहे.

येथे आज झालेल्या एका सोहळ्यात पंतप्रधान आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या हस्ते प्रसिद्ध सरोदवादक उस्ताद अमजद अली खान यांना राजीव गांधी सद्भावना पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्यात पंतप्रधान बोलत होते. जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये नुकताच हिंसाचार झाला. त्याचा संदर्भ देऊन पंतप्रधान म्हणाले, काही दिवसांपूर्वी देशात जातीय हिंसाचार झाला. त्यातून जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी कधीच हलगर्जीपणा केला जाऊ नये असा धडा आपण घ्यायला हवा.

अशा शक्तींना सर्व स्तरांवर; मग ते दैनंदिन जीवन असेल किंवा निवडणुका, विरोध करायला हवा. आपल्यात फूट पाडण्यात कुणाला यश येऊ नये यासाठी जातीय सलोख्याला प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न सातत्याने करायला हवेत, असे आवाहनही त्यांनी केले. ज्या समाजामध्ये विभाजन झालेले असते; तो समाज सर्वशक्तिनीशी प्रगती करू शकत नाही, अशी भावना यावेळी सोनियांनी व्यक्त केली.