तीन अवतारांत दिसणार बिपाशा

– बंगाली बाला बिपाशा बासूचे बर्‍याच दिवसांपासून एकाही चित्रपटातून दर्शन झालेले नाही. नवोदित नट्यांच्या वाढत्या प्रभावामुळे बिपाशाचे स्थान डळमळीत झाले की काय, अशी शंका अनेकांकडून व्यक्त होऊ लागली आहे, मात्र असे अजिबात नाही. आगामी हमशक्ल नावाच्या चित्रपटातून बिपाशा पुन्हा रूपेरी पडद्यावर अवतरणार आहे आणि ते सुद्धा एका नाही तर तीन अवतारांमध्ये. या चित्रपटात रितेश देशमुख प्रथमच तिचा नायक म्हणून दिसेल. सूत्रांच्या माहितीनुसार, रितेशची नायिका म्हणून बिपाशाला घेण्याआधी खरे तर या चित्रपटाचा निर्माता थोडा द्विधा मन:स्थितीत होता. कारण बिपाशा व रितेश यांची जोडी त्याला कोणत्याच अँगलने योग्य वाटत नव्हती. मात्र बराच विचार केल्यानंतर त्याने त्यांच्या जोडीवर शिक्कामोर्तब केले.

दुसरीकडे या चित्रपटात सैफ अली खान आणि दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना यांची जोडी यापूर्वीच निश्‍चित करण्यात आली आहे. तमन्नाला सैफ अली खानची नायिका म्हणून घेण्यात आले आहे. आता मल्टिस्टारर असलेल्या या चित्रपटात बिपाशाच्या वाट्याची भूमिका कितपत दमदार असेल, हा सगळय़ात मोठा सवाल आहे. मात्र या चित्रपटाचा दिग्दर्शक साजिद खान बिपाशालाच घेण्यासाठी उत्सुक होता. एवढेच नाही तर तिची भूमिकाही अन्य कलाकारांच्या तुलनेत महत्त्वाची ठरेल अशी त्याची योजना आहे. येत्या सप्टेंबरपासून या चित्रपटाच्या चित्रणाला सुरुवात होईल, अशी अपेक्षा आहे. मोठय़ा कालखंडानंतर म्हणजे राज-३ नंतर पहिल्यांदाच बिपाशाच्या वाट्याला हा चित्रपट आला असल्याने तीही त्यासाठी उत्सुक आहे. आपली भूमिका उजवी होण्यासाठी सध्या ती जोरदार मेहनत घेत आहे. आता तिची ही मेहनत कितपत सफल होते व तिच्या कारकिर्दीची काहीसी मंदावलेली गाडी पुन्हा गती घेते का, ते दिसेलच.

Leave a Comment