किश्तवारमध्ये हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन

किश्तवार – किश्तवार शहरामध्ये गेल्या शुक्रवारपासून दंगलीचे वातावरण आहे. हिंदू आणि मुस्लीम समाजातले लोक परस्परांचे जीव घेण्यास टपलेले आहेत, पण अशा वातावरणातही एका हिंदू कुटुंबातला विवाह समारंभ अडचणीत येत आहे असे दिसताच त्या विवाह समारंभाला मुस्लीम लोकांनी संरक्षण दिले आणि तो विवाह समारंभ शांततेत पार पडून नवविवाहित जोडप्याची बिदाई आनंदात कशी होईल याची व्यवस्था केली. या प्रकाराने दंगलीच्या वातावरणात सुद्धा हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन कसे घडवता येते हे या लोकांनी दाखवून दिले.

किश्तवार शहरामध्ये ज्या शुक्रवारी दंगली सुरू झाल्या त्याच शुक्रवारी शहिदी मोहल्ला या भागात राहणार्‍या डॉ. आशिष शर्मा याचा विवाह ठरलेला होता. शहिदी मोहल्ल्यामध्ये मुस्लिमांची ३०० तर हिंदूंची ६ घरे आहेत. अशा अवस्थेत दंगलीच्या वातावरणात हा विवाह समारंभ पार पडणार की नाही अशी चिंता शर्मा कुटुंबाला लागून राहिली होती आणि शर्मा कुटुंबातील सारी मंडळी हा विवाह पुढे ढकलावा असा विचार करत होती.

याच मोहल्ल्यात राहणार्‍या काही मुस्लीम तरुणांना ही बातमी कळली आणि त्यांनी डॉ. शर्मा यांच्या वडिलांची भेट घेऊन हा विवाह समारंभ लांबणीवर टाकू नये अशी विनंती तर केलीच, परंतु विवाहात कोणी विघ्न आणल्यास त्याची जबाबदारी आपण उचलू अशी तयारी दाखवली. मुस्लीम तरुणांच्या संरक्षणात वराची बारात वधूच्या घरापर्यंत आली. तिथे विवाह समारंभ शांततेत पार पडला आणि नवविवाहित जोडपे ७० मुस्लीम तरुणांच्या पहार्‍यात घरी आले. या हिंदू-मुस्लीम ऐक्याच्या दर्शनामुळे सर्वजण भारावून गेले. शहिदी मोहल्ल्यामध्ये मुस्लिमांची ३०० घरे आणि हिंदूंची केवळ सहा घरे आहेत पण ही हिंदू कुटुंबे ही आमची अमानत आहे अशी भावना या मुस्लिमांनी व्यक्त केली.