दिल्लीत कांदा ८० रुपये किलो

नवी दिल्ली – महाराष्ट्रात कांद्याचे भाव वेगाने वाढत असताना उत्तर भारतात सुद्धा कांद्याची टंचाई निर्माण झाली असून उत्तर भारतातल्या विविध शहरांमध्ये कांद्याच्या भावाने नवे विक्रम प्रस्थापित करायला सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत कांदा ८० रुपये किलो दराने विकला जात असून कांद्याची टंचाई अशीच जारी राहिली तर हा भाव १०० रुपये प्रती किलो पर्यंत वाढू शकतो, असे काही व्यापार्‍यांचे म्हणणे आहे. मात्र कांद्याच्या दराने दिल्लीकर ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आले आहे.

दिल्ली विधानसभेची निवडणूक येत्या नोव्हेंबरमध्ये होणार आहे. तोपर्यंत कांद्याचे भाव कमी झाले नाहीत तर सरकारला मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागेल अशी शक्यता राजकीय क्षेत्रात व्यक्त केली जात आहे. १९९८ साली दिल्लीतले भाजपाचे सरकार कांद्याचे भाव वाढल्यामुळे कोसळले होते. परंतु यावर्षीच्या निवडणुकांना आणखी तीन महिने आहेत आणि दरम्यानच्या काळात आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील कांद्याचे नवे पीक बाजारात आले तर भाव कमी होतील, अशी आशा सत्ताधारी पक्षाला वाटत आहे.

सर्वसाधारणपणे कांद्याची टंचाई असल्यामुळे भाव वाढत आहेत असे गणित मांडले जाते. परंतु शासकीय अधिकार्‍यांना हे म्हणणे मान्य नाही. बाजारात भरपूर कांदा आहे, पण तरीही भाव वाढत आहे असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र भरपूर साठा असूनही भाव का वाढत आहेत याची कारणमीमांसा त्यांना करता येत नाही. काही व्यापारी राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून कांद्याची साठेबाजी करून कृत्रिमरित्या भाव वाढवत असावेत असा त्यांचा अंदाज आहे.

Leave a Comment