ओडिशा, बंगालमध्ये दुर्मिळ कासवांची हत्या

कोलकत्ता – पश्‍चिम बंगालमधील मंदारमनी आणि दिघा या समुद्र किनार्‍यावरच्या पर्यटन स्थळावर पर्यटकांची संख्या अनियंत्रित झाली आहे. त्यामुळे या भागातल्या अतीशय दुर्मिळ समजल्या जाणार्‍या कासवांच्या काही जातींचे अस्तित्व धोक्यात आले आहे. वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड या संस्थेने या भागात होणार्‍या पर्यावरणाच्या हानीचा अभ्यास केला असून सरकारला या धोक्याबाबत सावध केले आहे. या संस्थेने दिलेल्या अहवालात गेल्या सहा वर्षांपासून ओलिव रिडले टर्टल्स् या जातीची कासवे अजिबात दिसेनाशी झाली असल्याचे म्हटले आहे.

पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील मंदारमनी, दिघा आणि शंकरपूर ही किनारी शहरे पर्यटन स्थळे म्हणून नावाजली गेली आहेत. परंतु या पर्यटन स्थळावर आलेल्या लोकांच्या सोयीसाठी होणार्‍या बांधकामामुळे कासवांना धोका निर्माण झाला आहे. या किनारी शहरांना लागून असलेला समुद्र किनारा ७ कि.मी. लांबीचा आहे आणि तोच पुढे ओडिशामध्ये जातो, जिथे गहिरमठ हे किनारी पर्यटन स्थळ आहे. तिथेही अशा प्रकारचे कासव नष्ट होत असल्याचे आढळले आहे.

हे कासव समुद्र किनार्‍याच्या लगत असलेल्या वाळूमध्ये आपले घरटे बांधत असते. परंतु अनेक व्यावसायिकांनी या वाळूंमध्ये आपले व्यवसाय सुरू केले आहेत. समुद्राला लागून हॉटेल आणि लॉजेस उभारलेले आहेत, काही ठिकाणी भिंती बांधलेल्या आहेत त्यामुळे या कासवांना घरटी निर्माण करणे अशक्य होऊन ती मरत आहेत. या समुद्र किनार्‍यानजिक जुलपूत आणि दादनपात्राबार ही ठिकाणे अजूनही पर्यटकांच्या गर्दीने व्यापलेली नाहीत. त्यामुळे तिथे अजून तरी या प्रकारचे कासव दृष्टीस पडत आहे. त्याचा तिथे बचाव करावा, असे आवाहन या संस्थेने केले आहे.

Leave a Comment