पुण्यभूमी ते देवभूमी या प्रवासाने कृतकृत्य झालोˆ – सिक्किमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील

पुणे, – सिक्कीम ही देवभूमी, उगवत्या सूर्याचे राज्य. पुण्यात मुळा – मुठा आणि कर्‍हेच्या पाण्यापासून घेतलेला मातृभूमीच्या सेवेचा वसा आता गंगटोकला उगवत्या सूर्याचरणी अर्पण करतोय. अशी भावना व्यक्त करत सिक्कीमचे नियुक्त राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी बुधवारी महाविद्यालयीन आठवणींना उजाळा दिला. निमित्त होते सप्रेम सपच्या वतीने आयोजीत करण्यात आलेल्या त्यांच्या सत्काराचे.

सर परशुराम भाऊ महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांची संघटना असलेल्या सप्रेम सपच्या वतीने सिक्कीमच्या राज्यपालपदी निवड झाल्याबद्दल संघटनेचे अध्यक्ष भारत देसरडा यांच्या हस्ते पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षणतज्ज्ञ डॉ. न.म. जोशी, स.प. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप शेठ, संघटनेचे कार्याध्यक्ष गजेंद्र पवार, पोलिस सहाअयुक्त विवेक फणसळकर, शिप्रमंडळाचे अध्यक्ष अभय दाढे आदी यावेळी उपस्थित होते.

महाविद्यालयीन आठवणींना उजाळा देताना पाटील म्हणाले, एनसीसीमध्ये असताना बी,सी ग‘ेडला मिळविलेले गोल्ड मेडल आणि बौरोबाच लगीन गाण्याच्या नृत्यावर मिळालेले पहिले पारितोषीक अशा दोन भिन्न गोष्टी एकाच वेळी करण्याची संधी महाविद्यालयाने दिली. हॉस्टेलवर असल्याने मीच सकाळी सोडलेली बातमी संघ्याकाळी कोणीतरी येऊन मला सांगायचे तुला कळल का? तेव्हा फार मजा वाटायची. महाविद्यालयाची शताब्दी दोन वर्षांनी आहे यासाठी सप्रेम सप काही करू पाहत आहे त्या प्रयत्नांना शिप्र मंडळींनी सहकार्य करावे असे अवाहन त्यांनी यावेळी केले.

जोशी म्हणाले, पाटील आणि मी महाविद्यालयात होतो ते दिवस मंतरलेले होते. आयएएस, राजकारणी ते आता राज्यपाल अशी विविध पदे भूषवणार्‍या पाटील यांची नाळ आजही मातीशी जोडलेली आहे. त्यांनी प्रशासनात आदर्श घालून दिला आहे तसाच आदर्श राज्यपाल कसा असावा याचाही ते घालून देतील अशी खात्री आहे.