‘आयटम सॉँग’द्वारे ऐश्‍वर्याचे पुनरागमन

ऐश्‍वर्या राय-बच्चनच्या रुपेरी पडद्यावरील पुनरागमनाकडे डोळे लावून बसलेल्या तिच्या चाहत्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. निळ्य़ा डोळ्य़ांची ही अभिनेत्री संजय लीला भन्साळीच्या ‘रामलीला’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये दमदार एंट्री घेणार आहे आणि तीही एका आयटम साँगवर धमाल नृत्य करत. ‘इश्क कमीना’ आणि ‘कजरारे कजरारे’ या आयटम साँगमध्ये अदाकारी दाखविणारी ऐश्‍वर्या पुन्हा एकदा आयटम नंबर करण्याचा विचार करत आहे.

भन्साळी आणि ऐश्‍वर्याचे संबंध किती मधुर आहेत, हे सांगण्याची गरज नाही. ‘हम दिल दे चुके सनम’, ‘देवदास’ व ‘गुजारिश’ या चित्रपटांमध्ये त्यांनी सोबत काम केलेले आहे. ऐश्‍वर्याने पुनरागमनासाठी भन्साळीच्या चित्रपटाला पसंती दिली असून त्यात ती आयटम नंबर करणार आहे. यासंबंधी अजून अधिकृत पुष्टी होऊ शकलेली नसली तरी ‘रामलीला’मध्ये ऐश्‍वर्या नक्कीच त्यासाठी होकार देईल, असा विश्‍वास भन्साळीला वाटतो. असाच विश्‍वास त्याला आपली आवडती अभिनेत्री माधुरी दीक्षितबाबतही वाटत होता, पण माधुरीने ही फक्त अफवा असल्याचे स्पष्ट करून तो विषय तिथेच संपविला होता. त्यामुळे सध्या तो ऐश्‍वर्याला राजी करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. यासंबंधी त्यांच्यामध्ये चर्चा झाली असून ऐश्‍वर्यानेही त्यात रस दाखविल्याचे कळते.

भन्साळीसोबतचे संबंध पाहता ती कदाचित या आयटम सॉँगला नकार देणार नाही, पण या गाण्याला आयटम नंबरऐवजी स्पेशल सॉँग म्हटले जावे, अशी तिची इच्छा आहे. आता भन्साळीची ही इच्छा खरोखरच पूर्ण होते की नाही, ते दिसेलच. ऐश्‍वर्याने सर्वात शेवटी भन्साळीच्याच ‘गुजारिश’मध्ये हृतिक रोशनसोबत काम केले होते. त्याचा आगामी ‘रामलीला’ हा चित्रपट शेक्सपिअरचे प्रसिद्ध नाटक ‘रोमियो’ आणि ‘ज्युलिएट’वर आधारित असून त्यात रणवीर सिंह, दीपिका पदुकोन व रिचा चड्डा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्यांच्यासोबत ऐश्‍वर्याचे नाव जोडले गेले तर चित्रपटाला नक्कीच फायदा होईल.

Leave a Comment