पुणे दि.३ – गुप्तवार्ता विभागाने पुणे पोलिसांना पुन्हा एकदा हाय अॅलर्ट दिला असून शहरात घुसलेल्या तीन संशयित व्यक्ती घातपात करण्याची शक्यता असल्याचा इशारा दिला गेला आहे. पुणे पोलिस विभागाने या इशार्याची गंभीर दखल घेतली असून शहरातील सर्व पोलिस ठाण्यांना आपापल्या क्षेत्रात सतर्क राहण्याचे आणि संशयित व्यक्ती आढळल्यास पूर्ण चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
बिहारमधील बोधगया येथील साखळी बॉम्बस्फोटानंतर पुणे आणि मुंबईत असाच इशारा दिला गेला होता. गुप्तवार्ता विभागाकडून मिळालेल्या इशार्यानंतर १२ ते २१ जुलै दरम्यान पुण्यात पोलिस बंदोबस्तात वाढ केली गेली होती. त्यातच पुण्यातील साखळी बॉम्बस्फोटांच्या घटनेला वर्ष पुरे झाल्यामुळे बंदोबस्त कायम होता. गुप्तवार्ता विभागाने दिलेल्या माहितीनुसार २८ जुलैला रात्री ३५ ते ४० वयोगटातील तीन संशयित व्यक्ती शहरात घुसल्या आहेत. त्यातील एकाच्या चेहर्याच्या डाव्या बाजूला तर दुसर्याच्या उजव्या हातावर दोन जुन्या जखमांच्या खुणा आहेत. या व्यक्ती शहरात घातपात करण्याच्या उद्देशानेच आल्या असाव्यात असा संशय आहे.