पन्नास वर्षांनंतर पाकिस्तानतर्फे ऑस्कर साठी चित्रपट

इस्लामाबाद दि.३ – सुमारे पाच दशकांनंतर पाकिस्तान यंदा परदेशी भाषा विभागात ऑस्करसाठी चित्रपट पाठविणार असल्याचे वृत्त आहे. अर्थात यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने अद्याप चित्रपटाची निवड केलेली नाही असेही समजते.

ऑस्करसाठीच्या निवड समितीचे अध्यक्ष शर्मिन ओबेद हे २०११ सालात ऑस्कर मिळालेल्या सेव्हिंग फेस या डॉक्युमेंटरीचे सह दिग्दर्शक आहेत. अॅसिड हल्यातून वाचलेल्या व्यक्तींवर ही डॉक्युमेंटरी बनविली गेली होती. ओबेद म्हणाले की आत्तापर्यंत परदेशी भाषा चित्रपट कॅटेगरी सुरू झाल्यापासून म्हणजे १९५६ पासून केवळ दोन पाकिस्तानी चित्रपट ऑस्करसाठी पाठविले गेले आहेत. त्यातील अख्तर कादर यांचा जागो हुवा सवेरा हा १९५९ साली तर ख्वाजा खुर्शिद अन्वर यांचा घुंघट हा १९६३ साली पाठविले गेले होते.

या विभागात प्रत्येक देशाला एक एन्ट्री पाठविता येते. १ आक्टोबर ही त्यासाठीची अंतिम तारीख आहे. यावर्षी पाकिस्तानात २१ चित्रपट रिलीज झाले आहेत. ओबेद यांच्या मते देशात युद्ध, दंगली, धार्मिक तेढी, दहशतवाद यामुळे चित्रपटांकडे लक्षच देता आलेले नाही. सरकारनेही कधी या क्षेत्राकडे गंभीरपणे पाहिलेले नाही. वास्तविक चित्रपट म्हणजे देशाचे म्हणणे मांडण्याचे प्रभावी साधन असते. मात्र यंदा ऑस्करसाठी चित्रपट पाठविता येतोय ही आनंदाची बाब आहे.

Leave a Comment